हिंगोली : येत्या निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, कोणत्याही नेत्याचे ‘ स्टेटस’ ठेवणार नाही, तसेच गावातही एकाही पक्षाच्या पुढाऱ्यांना येऊ देणार नाही, अशी शपथ हिंगोली जिल्ह्यातील  ५० हून अधिक खेडय़ांमध्ये दिली जात आहे. कोणत्याही संघटनेच्या वतीने ही प्रक्रिया सुरू  नाही, तर मराठा समाज म्हणून हा निर्णय अंमलबजावणीत आणण्यासाठी  बैठका सुरू आहेत. नक्की किती गावांत मतदान बहिष्कार आणि पुढारी बंदीचा हा निर्णय झाला याचा आकडा उपलब्ध नसला, तरी २२ गावांमध्ये बैठका झाल्याचे सांगण्यात आले. हिंगोली जिल्ह्यातील पळसगाव येथील एका मारुती मंदिराच्या पारावर ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत तरुणांना महारुद्र मारुती आणि छत्रपती शिवराय यांची शपथ घ्यायला सांगितली जात आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत एकाही पक्षाचा झेंडा खांद्यावर न घेता निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शपथ दिली जात आहे.