राज्य सरकारातील बाबूंना नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ाविषयी अचानक प्रेमाचे भरते आले आहे. एरवी या जिल्ह्य़ाकडे ढुंकूनही न पाहणारे सर्वच खात्याचे प्रधान सचिव येत्या शनिवारपासून जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर येऊ लागले आहेत. नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे व हिंसाचारामुळे गडचिरोली जिल्हा कायम चर्चेत आहे. गेल्या ३० वर्षांपासून या जिल्हय़ातील प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आता एकाच वेळी सारी यंत्रणा या जिल्हय़ात आणून बसवण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न वादग्रस्त ठरण्याचीच शक्यता अधिक आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात दाखल झालेले प्रधान सचिव दर्जाचे सर्व अधिकारी येत्या शनिवार व रविवारी या जिल्हय़ात फिरणार आहेत. मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया यांच्या नेतृत्वात तब्बल २७ खात्याचे प्रधान सचिव जिल्हय़ात येत आहेत. गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव अमिताभ राजन व वनखात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी या दोघांचा अपवाद वगळता सचिव दर्जाचा कोणताही अधिकारी अलीकडच्या काळात या जिल्हय़ात आलेले नाहीत. मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बांठिया यांनासुद्धा या जिल्हय़ाचा दौरा करायला वेळ मिळाला नाही. आता अधिवेशनाच्या निमित्ताने नागपुरात आलोच आहोत तर चला गडचिरोलीला जाऊन येऊ या मानसिकतेतून हा दौरा आखण्यात आल्याने अधिकाऱ्यांचा या जिल्हय़ातील दोन दिवसांचा मुक्काम सहल तर ठरणार नाही ना अशी शंका आता उघडपणे घेतली जात आहे.  मुळात गडचिरोलीतील समस्या सोडवण्यासाठी सर्वच खात्याच्या वरिष्ठांनी नियमितपणे आढावा घेण्याची व दौरे करण्याची गरज आहे. सचिवांच्या या दौऱ्यांमुळे स्थानिक सुरक्षा यंत्रणा व प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.हे सचिव जिल्हय़ाच्या दुर्गम भागात फिरणार असल्यामुळे पोलिसांनासुद्धा नियमित शोधमोहिमा बाजूला ठेवून बंदोबस्ताची तयारी करावी लागत आहे.

Story img Loader