सांगली : बिरोबाच्या नावानं चांगभलं, काशिलिंगाच्या नावानं चांगभलंच्या गजरात आणि खोबरं, भंडाऱ्याची उधळण करत शनिवारी आरेवाडीच्या बिरोबाची यात्रा संपन्न झाली. या वर्षी सुमारे तीन लाख यात्रेकरूंनी बिरोबाच्या बनात हजेरी लावली.

कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी येथे गेल्या दोन दिवसांपासून धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या बिरोबा यात्रेची सुरुवात झाली. बैलगाडीसह विविध वाहनांतून आलेल्या भाविकांनी देवळाच्या परिसरात असलेल्या बनातच मुक्कामाची सोय केली होती. शुक्रवारी मानाच्या येळावीतील गावडे कुटुंबांचा गोडा नैवेद्य अर्पण करण्यात आला. शनिवारी बिरोबाचा भक्त सूर्याबाला खारा नैवेद्य अर्पण करण्यासाठी सुमारे दहा हजार बकऱ्यांचा बळी देण्यात आला.

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व गोवा या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व धनगर समाजबांधवांचे आराध्य असलेल्या आरेवाडी येथील श्री बिरोबा देवाची यात्रा तीन दिवसांपासून सुरू आहे. यात्रेसाठी सुमारे तीन लाखांवर भाविक उपस्थित होते आणि उन्हाळ्यात भरणाऱ्या या यात्रेत सर्वांत मोठा पाणी पुरवठ्याचा प्रश्न असतो. मात्र, यात्रा समिती, ग्रामपंचायत व देवस्थान ट्रस्ट यांनी रायेवाडी तलाव व आरेवाडी तलाव येथून पाणी आणून भाविकांची चांगली सोय केली होती. मंदिर परिसरामध्ये चार ठिकाणी पाच हजार लिटर क्षमतेच्या टाक्या असल्याने व देवस्थानाच्या विहिरीतून व टँकरच्या माध्यमातून भाविकांना मुबलक पाणीपुरवठा केला.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी यात्रेत भेट देऊन येथील परिस्थितीची माहिती घेतली. तर, पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे व पोलीस निरीक्षक ज्योतीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १३६ पोलिसांचा यात्रेत बंदोबस्त होता. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, ढालगाव येथील डॉ. विनय कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भाविकांना पाणी निर्जंतुक करून दिले व सुमारे एक हजार भाविक रुग्णांवर उपचार करण्यात आले.

यात्रेत रात्री उशिरापर्यंत धनगरी ढोल, कैताळाच्या निनादात गजनृत्य, ओव्या सादर करण्यात येत होत्या. त्याचा भाविकांनी लाभ घेतला. बांगड्या भरणाऱ्या महिलांची मोठी गर्दी यात्रेत असते, त्यासाठी स्वतंत्र विभाग यात्रा समितीने केला होता. बांगड्या स्टॉलवर महिलांची गर्दी दिसत होती. तसेच हळदी-कुंकू, नारळ, बैलांच्या गळ्यातील पितळी घुंगराचे चामडी पट्टे, खेळणी, भांडी, घोंगडी, मेवामिठाई, थंड पेये अशा विविध स्टॉलवर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यात्रा सुरळीतपणे पार पडण्यासाठी श्री बिरोबा देवस्थान ट्रस्टचे कार्याध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे, अध्यक्ष काशिलिंग कोळेकर यांच्यासह विश्वस्त, पुजारी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, देवस्थानाचे कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.