रायगड जिल्ह्य़ात गेल्या काही महिन्यांपासून चोऱ्यांचे तसेच घरफोडय़ांचे प्रमाण वाढले आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांमुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भुरटय़ा चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जाते आहे.    रायगड पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नुकतीच मोबाइल पोलीस व्हॅन सेवा कार्यान्वित केली आहे. मात्र तरीही दिवसागणिक चोऱ्या, घरफोडय़ांचे प्रमाण वाढते आहे. गेल्या तीन महिन्यात दीडशेहून अधिक ठिकाणी चोरी आणि घरफोडय़ा आणि चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. त्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.      जिल्ह्य़ात गेल्या डिसेंबर महिन्यात चोरीच्या ३५ घटना घडल्या आहेत. यापैकी पंचवीस गुन्ह्य़ांचा तपास अद्याप लागला नाही. जानेवारी महिन्यात जिल्ह्य़ात ४७ ठिकाणी चोऱ्या आणि घरफोडय़ांची नोंद झाली, यातील ३५ गुन्ह्य़ांचा तपास अद्याप लागलेला नाही. फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्य़ात ४८ ठिकाणी चोऱ्या आणि घरफोडय़ांच्या घटना घडल्या. ३३ गुन्ह्य़ांतील गुन्हेगार सापडले नाहीत. तर सध्या चालू असलेल्या मार्च महिन्यात जिल्ह्य़ात जवळपास ५० ठिकाणी चोऱ्या, घरफोडय़ा आणि चेनस्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत. ही आकडेवारी पोलिसांच्या आणि त्याचबरोबर स्थानिकांसाठी च्िंातेचीच बाब आहे.      पोलिसांनी मोबाइल व्हॅन्सनी गस्त घालणे, नाकाबंदी करणे, गुन्हेगारांची तपासणी करणे, गावात नवीन आलेल्यांची तपासणी करणे यांसारखी पावले उचलली आहेत. मात्र ही अपुरी पडत आहेत. कारण सुरुवातीला रात्री घडणाऱ्या घटना आता दिवसाही होऊ लागल्या आहेत. त्यामुळे चोरांना पोलिसांची दहशत राहिली नसल्याची चर्चा सुरू आहे. चोऱ्यांमधील तपास लागण्याचे प्रमाणही नगण्य आहे. कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून जी मोबाइल वाहने पोलिसांनी सुरू केली आहेत ती वाहने एकाच जागी उभी राहत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सातत्याने वाढणाऱ्या चोऱ्या आणि घरफोडय़ा लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रशासनाने काही कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा