दुरुस्ती केंद्राकडून पहिले सुखोई हवाई दलाच्या स्वाधीन
नाशिक : ओझरस्थित हवाई दलाच्या देखभाल, दुरुस्ती केंद्रात संपूर्ण दुरुस्ती झालेले पहिले सुखोई विमान शुक्रवारी भारतीय हवाई दलाच्या स्वाधीन करण्यात आले. या कामास २२ ते २४ महिन्यांचा कालावधी लागला. सुखोईच्या संपूर्ण दुरुस्तीची केंद्राची ही पहिलीच वेळ होय. काम जसे व्यापक होत जाईल, त्याप्रमाणे हा कालावधी चार ते पाच महिन्यांनी कमी करण्याचे नियोजन आहे.
ओझर येथील ११ व्या देखभाल, दुरुस्ती केंद्रात झालेल्या या सोहळ्यास एअर मार्शल हेमंत शर्मा, दक्षिण-पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल एच. एस. अरोरा यांच्यासह केंद्राचे प्रमुख एअर कमांडोर समीर बोराडे उपस्थित होते. अत्याधुनिक सुविधा असणारे हे महत्वाचे दुरुस्ती केंद्र आहे. हवाई दलाच्या ताफ्यातील रशियन बनावटीच्या बहुतांश लढाऊ विमानांची संपूर्ण दुरुस्ती (ओव्हरऑल) आणि अद्ययावतीकरणाचे (अपग्रेडेशन) काम या केंद्राने केले आहे. सुखोईच्या संपूर्ण दुरुस्तीला केंद्रात सुरूवात झाली. सुखोईची बांधणी करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमार्फत दुरुस्तीची कामे आधीपासून केली जातात. सुखोई ३० विमानाचे १५०० तास उड्डाण झाल्यानंतर ही दुरुस्ती करावी लागते. नव्या विमानाची बांधणी आणि कार्यरत विमानांची दुरुस्ती यात कमालीचा फरक असतो. नव्या विमानाची बांधणी करताना सर्व सुटय़ा भागांची निकषानुसार जोडणी करावी लागते. दुरुस्तीत काही वर्षे कार्यरत राहिलेल्या विमानाचे सर्व भाग विलग करून सुटय़ा भागांची झीज, यंत्रणांमधील दोष यावर संशोधन केले जाते. या प्रक्रियेत सदोष सुटे भाग काढून त्यांच्या जागी नवीन भाग बसविले जातात. केंद्राला पहिल्या सुखोईच्या दुरुस्तीला सुमारे २४ महिन्यांचा कालावधी लागला. एप्रिल २०१८ रोजी या सुखोईने हवेत उड्डाण केले होते. पुढील काळात उड्डाणाच्या अनेक चाचण्या पार पडल्या. आता हे विमान हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झाले आहे.