रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते राजापूर दरम्यान वेरवली मांडवकरवाडी दरम्याने ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक विस्कळीत झाली.  यासर्वांचा  फटका ११ गाड्यांना बसला.  या मार्गावर धावणा-या रेल्वे गाड्या ठिक ठिकाणी थांबवण्यात आल्या होत्या.

 कोकण रेल्वे मार्गावर ही घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास  घडली. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाच्या अथक प्रयत्नाने  साडेतीन तासानंतर यामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार,  हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम ही मंगला एक्सप्रेस वेरवली येथे आली असता गाडीचा पॅन्टोग्राफ हा ओव्हरहेड वायरला आधार देणाऱ्या तारेमध्ये अडकून ती तुटल्यामुळे ओव्हरहेड वायरमध्ये बिघड निर्माण झाला. यामुळे त्रिवेंद्रम ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस तसेच मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेससह एकूण ११ गाड्या विविध स्थानकांवर थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.

कोकण रेल्वे प्रशासनाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायरमधील बिघाड दूर केल्यानंतर सुमारे  साडेतीन तास विस्कळीत झालेली रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू झाली. रेल्वे वाहतुकीतील बिघाड दूर केल्यानंतर अडकून पडलेली राजधानी एक्सप्रेस घटनास्थळावरून प्रथम  रवाना करण्यात आली. यामुळे कोकण रेल्वे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.