भाईंदर येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर रौप्यमहोत्सवाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रक्तदान शिबिर आणि जातीयव्यवस्थेवरून परखड मत स्पष्ट केले आहे. तसंच, स्वतःच्या जातीचा अहंकार बाळगून दुसऱ्या जातीचा द्वेष करणाऱ्या लोकांवरही त्यांनी आज शाब्दिक प्रहार केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “पूर्वी स्वतःच्या जातीबद्दल अभिमान असायचा. राजकारण्यांनी इतका गोंधळ घातला आहे की आता स्वतःच्या जातीबद्दल अहंकार सोडा, दुसऱ्यांच्या जातीबद्दल द्वेष निर्माण केला आहे.”
ते पुढे म्हणाले की, “स्वतःच्या जातीचा अहंकार, दुसऱ्या जातीचा द्वेष अशा वृत्तीच्या लोकांनी रक्तदान शिबिर ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. हॉस्पिटलमध्ये येणारं ब्लड बँकेतील रक्त त्यावर ओ पॉझिटीव्ह, ओ निगेटीव्ह असंच लिहिलेलं असतं. त्यावर कोणत्या जातीच्या माणसाने रक्त दिलंय हे लिहिलेलं नसतं. त्यामुळे ज्या जातींचा द्वेष आपण आजपर्यंत करत आलो कदाचित त्या जातीचं रक्त आज आपल्या अंगात चढवलं असेल तेव्हा तुम्ही काय करणार आहात? ही जात आवडत नाही म्हणून तुम्ही काढून टाकणार आहात? काढून तर बघा”, असं स्पष्ट परखड मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं.