राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून गंभीर परिस्थिती असतानाच नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाकीतून गळती झाल्याने २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान अजून काही रुग्ण गमावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णालयातील काही रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक महापालिकेच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकीतून गळती झाली होती. ऑक्सिजन टँकरमधून टाकीत भरला जात असताना ही गळती सुरु झाली. टाकीमधील गळती रोखण्यासाठी तसंच दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालं होतं. दरम्यान रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ पैकी २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
“ऑक्सिजनचं प्रेशर कमी झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची आत्तापर्यंतची आकडेवारी हाती आली आहे. याविषयी महापालिका आयुक्त आणि पालिकेच्या इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकेल. यासंदर्भात सरकारला देखील माहिती कळवण्यात आली आहे,” अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

राजेश टोपेंनी काय सांगितलं –
“ऑक्सिजन टाकीचा व्हॉल्व लिकेज झाला होता. ऑक्सिजन टाकीला लिकेज झाले आणि त्यामुळे ऑक्सिजन प्रेशर कमी होऊन व्हेंटिलेटर्सवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती स्थानिक प्रशानसनाने दिली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं.

मनपा आयुक्तांनीही ११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. रुग्णालयात १५० रुग्ण होते, यापैकी २३ रुग्ण व्हेंटिलेटर आणि इतर रुग्ण ऑक्सिजनवर आहेत असं त्यांनी सांगितलं होतं. यावेळी त्यांनी सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करु असं सांगितलं आहे. दरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मनपा आयुक्तच यासाठी जबाबदार असून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळाल्यानंतर रुग्णालयात मोठी गर्दी होत असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. करोनाच्या नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पोलीस गर्दी कमी करत आहेत. याशिवाय संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. तसंच नातेवाईकांच्या भावनांचा उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलीस आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित आहेत.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Oxygen leakge in nashik zakir hussain hospital sgy