राज्यात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. यावरून लोकांचा प्राणवायू रोखण्याची ही कोणती कर्नाटकनीती? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने विचारला आहे.
“केंद्र सरकारकडून राज्यात ५० मेट्रिक टन ऑक्सिजन साठा कर्नाटकमार्गे येत होता. बुधवारी रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी दिल्लीत फोन करून हा साठा कर्नाटकात रोखल्याचे वृत्त समोर आले आहे. यातून महाराष्ट्र राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याच्या नियोजनाला धक्का बसणार” असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा ५० मेट्रिक टन ऑक्सिजनसाठा कर्नाटकमार्गे येत असताना बुधवारी रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री @BSYBJP यांनी दिल्लीत फोन करून हा साठा कर्नाटकात रोखल्याचे वृत्त समोर आले आहे. यातून महाराष्ट्र राज्यातील ऑक्सिजन पुरवठ्याच्या नियोजनाला धक्का बसणार आहे.
— NCP (@NCPspeaks) May 6, 2021
कर्नाटक सरकारने ऑक्सिजन साठा रोखल्याने कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन कोरोना बळींचे प्रमाणही वाढू शकते. करोनाचे संकट ही राष्ट्रीय आपत्ती आहे. त्यासोबत एकजुटीने लढण्याऐवजी राजकारण करुन लोकांचा प्राणवायू रोखण्याची ही कोणती नवी नीती कर्नाटक सरकारने अवलंबली आहे?, असा प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. या मुद्द्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये वाद सुरू असल्याचं देखील दिसून येत आहे. या मुद्द्यावरून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, राज्यात उत्पादित होणारा आणि इतर राज्यातून प्राप्त होणारा ऑक्सिजन राज्यातील सर्व जिल्ह्यांना सुरळीतपणे व त्या-त्या जिल्ह्याच्या आवश्यकतेनुसार प्राप्त होणे अत्यंत गरजेचे आहे.