सावंतवाडी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला दिलेला संदेश योग्य आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीय सरकारसोबत असले पाहिजेत, परंतु सरकारने कोणताही निर्णय घेताना त्याचा भारतावरच उलटा परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. ते आंबोली नांगरतास येथील वसंतदादा पाटील ऊस संशोधन केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी पर्यटकाला धर्म विचारून मारणे हे भयंकर कृत्य असल्याचे सांगितले.
पवार गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शुक्रवारी त्यांनी आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्राला भेट देऊन संशोधकांशी चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलले. यावेळी माजी मंत्री प्रवीण भोसले, जिल्हा बँक माजी संचालक व्हिक्टर डान्टस,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, ऊस संशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी प्रभाकर देशमुख उपस्थित होते.
पवार म्हणाले, “मी गेल्या दोन दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. गुरुवारी वेंगुर्ला येथील फळ संशोधन केंद्राला भेट दिली. तेथे काजूवर नवनवीन प्रक्रिया उद्योग उभे राहत आहेत, ही भूषणावह बाब आहे. काजू पिकांबाबत जनतेत किती उत्साह आहे, हेही तपासून घेतले पाहिजे. संशोधनाचे काम चांगले सुरू आहे.”
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील हल्ल्याबाबत पवार यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “धर्म विचारून एखाद्या पुरुषाला मारणे म्हणजे परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे. जे काही लोक धर्माबाबत अधिक बोलतात, त्यांनाच सरकार पाठिंबा देते हे योग्य नाही.”
सर्वपक्षीय बैठकीत सरकारला पाठिंबा
पहलगाममध्ये घडलेल्या घटनेनंतर केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला आमच्या पक्षाकडून लोकसभेतील नेत्या सुप्रिया सुळे यांना पाठवण्यात आले होते. त्यामुळेच सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला आम्ही पाठिंबा दिला आहे आणि सर्वजण सरकारसोबत आहोत. कारण हा हल्ला भारतावर झालेला आहे. त्यामुळेच सरकारला पाठिंबा देणे गरजेचे आहे. परंतु, सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे आणि कोणताही निर्णय घेतल्यास तो तडीस न्यावा, असे आवाहन पवार यांनी केले.
काही निर्णय विचारपूर्वक घ्यावेत
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानवर काही निर्बंध लादले आहेत. परंतु, हे निर्बंध लादताना सरकारने थोडा विचार केला पाहिजे. भारताची विमानसेवा जर पाकिस्तानमधून जात असताना बंद केली, तर त्याचा परिणाम भारतावरच होईल. असे अनेक निर्णय आहेत, परंतु यातून पाकिस्तानलाही एक संदेश जाईल, असे पवार म्हणाले.