Maharashra Tourists In Jammu And Kashmir: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून जम्मू आणि काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान महाराष्ट्रातीलही शेकडो पर्यटक सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले आहेत. या पर्यटकांना परत राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. आज दुपारी श्रीनगरहून तिसरे विमान २३२ पर्यटकांना घेऊन मुंबईत पोहचणार आहे. याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्य सरकारच्या वतीने विशेष विमानांची व्यवस्था केली जात आहे.”

“आज दुपारी २३२ पर्यटकांना घेऊन इंडिगोचे तिसरे विशेष विमान आज दुपारी श्रीनगर येथून निघेल आणि सायंकाळी मुंबईत पोहोचेल. काल दोन विशेष विमानांनी १८४ पर्यटक मुंबईत पोहोचले होते. आतापर्यंत सुमारे ५०० पर्यटक परतले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने पोस्टमध्ये दिली आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील तिघे, पुण्यातील दोन व पनवेलमधील एका रहिवाशाचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील अनेकजण अजूनही तिकडे अडकले आहेत. त्यांना सुरक्षित महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणावरून राज्यात अनेक प्रतिक्रिया येत असून मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, राज्यातील अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेतला. जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने चार विमानांची व्यवस्था केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः जम्मू आणि काश्मीरमध्ये उपस्थित असून, शक्य तितक्या पर्यटकांना परत आणण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत. परिणामी, आतापर्यंत चार विशेष विमानांमधून एकूण ५२० पर्यटक सुरक्षितपणे मुंबईत परतले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.

मंगळवारी पहलगाममधील बैसरन कुरणात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यात तब्बल २६ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातीलील हा सर्वात घातक हल्ल्यांपैकी एक होता. पुलवामा हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले होते.