सांगोला मतदार संघाचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांचा काही दिवसांपूर्वी एक ऑडिओ कॉल व्हायरल झाला होता. आसाममधील गुवाहाटी याठिकाणी गेल्यानंतर शहाजी बापू पाटील यांनी आपल्या एका कार्यकर्त्याला फोन करून तेथील परिस्थितीचं वर्णन केलं होतं. “काय झाडी, काय डोंगार, काय हाटील, सगळं एकदम ओके मदी हाय” अशा आशयाचा त्यांचा डायलॉग व्हायरल झाला होता.
यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मतदारसंघाचे बंडखोर शिवसेना आमदार संदीपान भुमरे यांचा ऑडिओ कॉल व्हायरल झाला आहे. त्यांनी फोनवरून आपल्या मधूकर नावाच्या एका कार्यकर्त्याशी संवाद साधत “लोकांना मिरची लागेल अशा पोस्ट” सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा आदेश दिला होता. मिरची लागेल म्हणजे विरोधकांना झोंबतील अशा पोस्ट. त्यांचा हा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर अन्य एका अज्ञात कार्यकर्त्याने भुमरे यांना फोन करून त्यांची खिल्ली उडवली आहे.
संबंधित कार्यकर्त्याने संदीपान भामरे यांना फोन करून “मिरची लावून पोस्ट कशा सोडायच्या” असा सवाल विचारला आहे. मिरचीवाला ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यामुळे भुमरे हे यावेळी काहीसे सावध झाल्याचं पाहायला मिळाले.
संबंधित कार्यकर्त्याने भुमरे यांना फोन करून आपण पैठवणवरून बोलत असल्याचा दावा केला. तसेच व्हायरल ऑडिओ कॉलमधील कार्यकर्ता मधूकर याचा फोन लागत नसल्याने तुम्हाला कॉल केला, असंही त्यानं सांगितलं. त्यानंतर त्यानं “साहेब, मिरची कुणाला लागली पाहिजे, कशी पोस्ट सोडली पाहिजे, तुम्ही सांगा ना साहेब म्हणजे ते वाक्य टाईप करून पोस्ट करतो,” अशी विचारणा केली.
त्यावर कार्यकर्त्याचा खोचक सूर लक्षात आल्यानंतर भुमरे सावध झाले, “तुम्ही पैठणवरून बोलत नाहीत, कशाला हे करता” असं ते म्हणाले. त्यांचा हा ऑडिओ कॉल सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.