पैठणीला केंद्र शासनाकडून पेटंट मिळूनही अजून दक्षिणेकडील राज्यांमधून येणाऱ्या सेमी पैठणीमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक पैठणी व्यावसायिकांची वाट अजूनही खडतरच आहे. हस्तमागावर बनवलेली वैशिष्टय़पूर्ण पैठणी ही महाराष्ट्राची एक ओळख आहे. औरंगाबादमधील पैठण आणि नाशिक येथील येवला या ठिकाणी अनेक कुटुंबांचा हस्तमागावर पैठणी तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय आहे. हातमागावर एक पैठणी तयार करण्यासाठी व्यावसायिकाला किमान आठ ते दहा दिवस लागतात. काही पैठण्यांचे काम तर तब्बल दोन वर्षही केले जाते.
पैठणीला २०१० मध्ये केंद्र शासनाने ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट’ नुसार पेटंटही दिले होते. मात्र, अजूनही दक्षिणेकडील राज्यांमधून येणाऱ्या सेमी पैठणीमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक पैठणी व्यावसायिकांना महाराष्ट्राबाहेर पैठणी पोचवण्यासाठी आणि आता काही प्रमाणात महाराष्ट्रातील बाजारपेठेतही आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागत आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, पैठणी तयार करण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि बाजारपेठ या गोष्टींचा ताळमेळ बसवणे व्यावसायिकांना कठीण होत आहे. बदलता काळ आणि बाजारपेठ लक्षात घेऊन पैठणी व्यावसायिकही नवे प्रयोग करत आहेत. पैठणीच्या ओढण्या, ड्रेस मटेरिअल, कुडते, पर्स अशा नव्या गोष्टीही व्यावसायिकांनी बाजारपेठेत आणल्या आहेत. सध्या महाराष्ट्राबाहेर गुजराथ, दिल्ली या ठिकाणी पैठणीला मागणी आहे. मात्र, बनावट पैठणीमुळे महाराष्ट्रातील मूळ पैठणीला योग्य किंमत मिळत नसल्याची खंत व्यावसायिक व्यक्त करत आहेत.
याबाबत येवल्यामध्ये परंपरागत पैठणी तयार करणारे व्यावसायिक नारायण दिवटे यांनी सांगितले, ‘‘हातमागावर सर्वात कमी काम असलेली पैठणी तयार करण्यासाठी किमान ३ हजार ५०० रुपये खर्च येतो. त्यानंतर ती पैठणी बाजारात पोहोचते, त्यामुळे या पैठणीची बाजारपेठेतील किंमत जास्त असते. याउलट दक्षिणेकडील राज्यांमधून सेमी पैठणी अगदी हजार रुपयांपासूनही मिळते. सेमी पैठणी ही यंत्रमागावर तयार केली जाते आणि त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धाग्यामध्ये आणि जरीमध्येही फरक असतो. महाराष्ट्राच्या पैठणीला पेटंट मिळूनही त्याबाबत पुढे कार्यवाही झाली नाही. त्यामुळे पारंपरिक पैठणीच्या बाजारपेठेवर त्याचा परिणाम होत आहे.’’
संग्रहित लेख, दिनांक 6th Nov 2012 रोजी प्रकाशित
पेटंट मिळूनही पैठणीची वाट खडतरच
पैठणीला केंद्र शासनाकडून पेटंट मिळूनही अजून दक्षिणेकडील राज्यांमधून येणाऱ्या सेमी पैठणीमुळे महाराष्ट्रातील पारंपरिक पैठणी व्यावसायिकांची वाट अजूनही खडतरच आहे. हस्तमागावर बनवलेली वैशिष्टय़पूर्ण पैठणी ही महाराष्ट्राची एक ओळख आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-11-2012 at 01:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paithani way difficult