देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी जव्हार तालुक्यातील राजेवाडी येथील लक्ष्मणभाऊ शिंदे (६५) हे त्यांच्या घरावर झेंडा लावण्यासाठी चढले होते, मात्र त्याचवेळी छपरावरील कवलं फुटल्याने ते खाली कोसळले आणि या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
लक्ष्मणभाऊ शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. आज(शनिवार) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते त्यांच्या घरावर तिरंगा ध्वज लावण्यासाठी चढले होते यानंतर कवलं फुटून ते खाली पडले. त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्याने, नाशिक येथील सत्र रुग्णालयात हलविण्यात आले मात्र तेथेच त्यांचे निधन झाले.
केवळ झेंडा लावून समस्या सुटणार नाही –
देशाच्या पंतप्रधान यांनी हर घर तिरंगा मोहीम राबवण्याऐवजी जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा इत्यादी भागांमध्ये प्रत्येक गावात रुग्णवाहिका पोहोचण्यासाठी रस्ते, पिण्यासाठी स्वच्छ पाणी, शिक्षणाची व रोजगाराची सुविधा निर्माण व्हायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासकीय योजनांच्या जनजागृतीचा अभाव असताना प्रत्येकाला घर रोजगार देणे आवश्यक असून केवळ झेंडा लावून समस्या सुटणार नाही. अशी भावना ग्रामीण भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.