पालघरमधील तलासरी तालुक्यातील झाई शासकीय आश्रमशाळेतील चौथी इयत्तेमध्ये शिकणाऱ्या सारिका भरत निमला (9) या विद्यार्थिनीचा आज(शनिवार) मृत्यू झाला.
या विद्यार्थिनीला डोकेदुखी होत असल्याने तिला देहरी हॉस्पिटल येथे तपासणी करून औषधे देण्यात आली होती. त्यानंतर आज सकाळी ती अचानक बेशुद्ध पडली असता, तिला घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने तिला डहाणू कुटीर रुग्णालयात हलविण्यास सांगितले होते. मात्र डहाणू रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी तिला मृत घोषित करण्यात आले.
अन्य काही विद्यार्थ्यांची तपासणी –
या विद्यार्थिनी सोबत अन्य काही विद्यार्थ्यांची तपासणी काल करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे निश्चित कारण सांगता येईल, असे प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.
अनेक विद्यार्थ्यांना डोकेदुखी, ताप व पोटदुखी याचा विकार –
दरम्यान या आश्रम शाळेला मध्यवर्ती स्वयंपाक गृहातून जेवण येत असल्याने अन्नातून विषबाधा झाल्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले आहे. या आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना डोकेदुखी, ताप व पोटदुखी याचा विकार असून त्यापैकी गंभीर वाटणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना डहाणू कुटी रुग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती घोलवड पोलिसांनी दिली आहे.