कल्पेश भोईर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालक – विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यंदा मेमध्ये यादी जाहीर

पालघर जिल्ह्य़ात एकूण १९० शाळा अनधिकृत असल्याचे बुधवारी जिल्हा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आले. यापैकी सर्वाधिक म्हणजे १५० अनधिकृत शाळा या वसई आणि विरार शहरातील आहेत. पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक टाळण्यासाठी यंदा प्रथमच मे महिन्यात अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पालघर जिल्ह्य़ात शिक्षणाचा बाजार मांडण्यात आला आहे. या स्पर्धेत अनधिकृत शाळा उभारल्या जात आहेत. यात पालक आणि विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात येत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेने मे महिन्यातच अशा शाळांची यादी जाहीर केली आहे. वसई तालुक्यातील सर्वाधिक १५० अनधिकृत शाळांपैकी सर्वाधिक शाळा या नालासोपारामधील पेल्हार विभागातील आहेत.

मागच्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या यादीत १९९ शाळा अनधिकृत होत्या. यातील नऊ शाळा नियमित करण्यात आल्या आहेत. मागील वर्षी जून महिन्यात यादी जाहीर केली होती, त्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता.

ग्रामीण आणि शहरी भागात फोफावणाऱ्या अनधिकृत शाळांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. अशा बेकायदा उभ्या राहिलेल्या शाळांना वेळीच लगाम घातला नाही तर याचे प्रमाण अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

यासाठी अशा शाळांची यादी लवकर जाहीर करण्यात यावी, अशी मागणीदेखील पालकांनी केली होती. यासाठी २० एप्रिल २०१९ रोजी लोकसत्तामध्ये ‘अनधिकृत शाळांच्या यादीची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते.

२०१९-२० या शैक्षणिक वर्षांची सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक भागांतील शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. तर काही शाळांचे जाहिरात फलक चौकात झळकू लागले आहेत. त्यामुळे शहरातील कोणती शाळा अधिकृत आहे वा अनधिकृत आहे, हे कळू न शकल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होऊ  नये यासाठी शिक्षण विभागाने यादी लवकरच प्रसिद्ध केली असून याबाबतची जनजागृतीदेखील करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच कोणत्याही शाळेत प्रवेश घेताना ती शाळा अधिकृत आहे की अनधिकृत याची चौकशी करूनच प्रवेश घेण्यात यावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

बेकायदा शाळांबद्दल विद्यार्थी आणि पालक यांच्यात जागृतीसाठी शिक्षण विभागाच्या वतीने शाळेबाहेर शाळा अनधिकृत असल्याचे सूचना फलक, अनधिकृत शाळा आहेत अशा ठिकाणी जाऊन पालकांना प्रवेश घेऊ  नये, यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. तसेच ज्या ज्या भागात या शाळा उभ्या राहिल्या आहेत, त्या ठिकाणच्या विभागात ध्वनिवर्धकावरून पुकारण्यात येणार आहे.

– राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी, पालघर