दुर्घटना रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानातून प्रयत्न

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर जिल्ह्यामध्ये अपघातांची संख्या वाढत असून गेल्या वर्षभरात १,३६० अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये ५०५ जणांना आपला जीव गमवावा लागला. रस्ते दुघर्टना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे रस्ते सुरक्षा अभियानातून सांगण्यात आले.

पालघर जिल्ह्य़ात वाहने चालवताना मोठय़ा प्रमाणात अपघात होऊ  लागले आहेत. हे अपघात रोखण्यासाठी वसईच्या उपप्रादेशिक वाहतूक विभागाच्या वतीने नुकताच रस्ते सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत जनजागृती करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात वर्षभरात १ हजार ३६० अपघात झाले असल्याची माहिती वाहतूक विभागाने या वेळी दिली.

जिल्ह्य़ात वाढते अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने कारवाया सुरूच असतात; परंतु अतिवेगाने वाहन चालवणे, नियमांचे उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालवणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे अशा विविध कारणांमुळे अपघात होत असतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. याला नियंत्रणात आणण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजनाही केल्या जात आहेत; परंतु त्याचेही पालन होत नसल्याने या अपघाताला पायबंद घालणार कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

२०१७ मध्ये १ हजार ४५३ अपघात झाले. त्यामध्ये ४८७ जणांचा मृत्यू झाला. २०१८ मध्ये १ हजार ३६० अपघात झाले आहेत. गेल्या वर्षीपेक्षा जर अपघाताचे प्रमाण कमी असले तरी अपघाती मृत्यूच्या संख्येत वाढ झाली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली. अपघात रोखण्यासाठी रस्ते सुरक्षा अभियानाच्या माध्यामातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. जनजागृती, रस्ते सुरक्षाविषयक मार्गदर्शन, पथनाटय़ उपक्रमांतून प्रयत्न केले जात आहेत. रस्ते सुरक्षा अधिक चांगल्या प्रकारे कशी राबवता येईल यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने एक मोठी मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी सांगितले.

रस्त्यावरील होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाचे वाहतूक पोलीस प्रयत्न करत असतात; परंतु असे रस्त्यावर अपघात होऊ  नयेत आणि जनजीवन विस्कळीत होऊ  नये यासाठी नागरिकांनीही वाहने चालवताना काळजी घेतली पाहिजे तरच यावर चांगले नियंत्रण मिळवता येईल.

– संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण विभाग.