पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विविध २७ जागांवर इतर पक्षाशी हातमिळवणी न करता काँग्रेस स्वबळावर पोटनिवडणूक लढवणार असल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व माजी खासदार हुसेन दलवाई यांनी पालघरमध्ये दिली. पालघर जिल्ह्यातील बहुतांश जागावर काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्‍वास त्यांनी या वेळेला व्यक्त केला.

हुसेन दलवाई यांनी पालघर येथील काँग्रेस भवनामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली. या निवडणुकीसाठी पालघर जिल्ह्यात काँग्रेसच्या मंत्र्यांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २९ तारखेला दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व नेते पालघरमध्ये ठाण मांडून राहणार आहेत. स्थानिक स्तरावर निवडणुकांमध्ये इतर पक्षांशी हातमिळवणी केल्यास इतर पक्ष मते फिरवण्याची दाट शक्यता लक्षात घेता काँग्रेस पालघरमध्ये एकला चालो रे च्या भूमिकेत आहे, असे ते म्हणाले. स्थानिक स्तरावर स्वबळावर निवडणुका लढणार असल्याने राज्याच्या महाविकास आघाडीवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही, असेही त्यांनी येथे स्पष्ट केले. स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय आघाडी सरकारने विचारविनिमय करूनच घेतलेला आहे. यामुळे पक्षाला स्थानिक स्तरावर बळकटी येणार असल्याने ह्या निवडणुका स्वबळावर लढवल्या जात आहेत असे त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले.

पालघर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु असून भविष्यात काँग्रेस हा आघाडीचा पक्ष म्हणून पालघरमध्ये उभा राहील असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. पालघरमध्ये पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यात मतभेद असू शकतात, मात्र मनभेद नाहीत. त्यामुळे ते सर्व पक्षशिस्त पाळतील व पक्षाचे काम प्रामाणिकपणे करतील असा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader