ढोबळी मिरची ऐवजी पालघर, डहाणूत २ हेक्टर क्षेत्रात ऑर्किडची लागवड

नितीन बोंबाडे, लोकसत्ता

डहाणू: पालघर जिल्हय़ातील पालघर, डहाणू तालुक्यात आकर्षक ऑर्किड (orchid) फुलांची दोन हेक्टर क्षेत्रात नावीन्यपूर्ण लागवड करून काही प्रगतिशील शेतकऱ्यांनी ऑर्किड लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. वाणगाव येथील बागायतीमधून विक्रमी लागवड होत असलेल्या ढोबळी मिरचीला भविष्यात हा उत्तम पर्याय ठरू शकतो,  असा विश्वास कृषीतज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. पालघरला मुंबई बाजारपेठ नजीक असल्याने चांगले उत्पन्न देणारी ऑर्किड फुलांची लागवड भविष्यात फुलशेतीला तसेच मिरची लागवडीला पर्याय ठरू शकतो.

आकर्षक रंगांच्या ऑर्किड फुलांना बडय़ा पंचतारांकित हॉटेल्स, पुष्पगुच्छ, सजावट, उत्सव, सण, समारंभ, उत्सव यांना मोठी मागणी असते. आकर्षक रंगाच्या या फुलांची थायलंड, बँकॉकहून मुंबईत प्रतिदिन कोटय़वधींची आवक आहे. पालघर जिल्ह्यतील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या नावीन्यपूर्ण ऑर्किड लागवडीमुळे पर्याय उपलब्ध झाला आहे. आता दर्जेदार, ताजी, टवटवीत ऑर्किड फुले मिळत आहेत. पालघर जिल्हय़ातील ऑर्किडच्या फुलांना करोना काळाचा समाना करावा लागला. टाळेबंदीतही या फुलांना ५ ते १० रुपयेपर्यंत भाव आला. गणपतीच्या काळात १० ते २० रुपये भाव मिळाला. हा भाव ३० रुपये प्रति नग मिळेल असे बागायतदारांचे म्हणने आहे. ही लागवड अत्यंत खर्चीक असून सामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे  शासनाने यासाठी सबसिडी उपलब्ध करून दिल्यास ऑर्किडच्या लागवड क्षेत्रामध्ये विस्तार घडून येईल, असा विश्वास ऑर्किड बागायतदार प्रसाद सावे यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केला आहे.

ऑर्किडच्या रोपाला १० वर्षांपर्यंत फुले लागतात. पहिल्या वर्षांत पाच ते सहा फुलांपासून सुरू झालेली फुलांची संख्या ३० पर्यंत वाढत जाते. त्यामुळे यातून चांगले उत्पन्न मिळते. विशेष म्हणजे या फुलांना  फवारणी करावी लागत  नाही. ऑर्किड एरॉपॉलिक म्हणजे हवेतून खत घेतात. त्यावर येणारे रोग अत्यंत कमी पाहायला मिळतात. भाजीपाल्याप्रमाणे आलटून पालटून येणारे रोग ऑर्किडला लागत नाहीत. ऑर्किडला ड्रीप्स, माईल आदी आजार होतात. पण त्यावर तात्काळ उपचार होतो. डहाणू तालुक्यात बहुतांश बागायतदार मिरची, नारळ, चिकूचे  विक्रमी उत्पादन घेतात. ढोबळी मिरची तसेच अन्य उत्पादनाला कीटकनाशक फवारणी, खतांचा वापर आणि त्यावर होणारा खर्च  मोठा आहे. ऑर्किड लागवडीचे ५ ते ६ महिन्यांत सुरू होणारे उत्पन्न डहाणू तालुक्यातील ढोबळी  मिरचीला पर्याय ठरू शकते.

वाणगावनजिकच्या केतखाडी येथे प्रसाद भानू सावे यांनी एक एकर, तर रामू सावे यांनी चिंचणी येथे  दोन एकर क्षेत्र, चिन्मय राऊत यांनी साखरे, निमिष सावे यांनी चिंचणी येथे एक एकर जागेत ऑर्किडच्या फुलांची लागवड केली आहे. रामू सावे, भानू सावे, चिन्मय राऊत यासारख्या प्रगतिशील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला शोधलेला नवा पर्याय अन्य बागायतदारांना संधी देणारा ठरू शकतो.

१ एकर जागेसाठी ८० लाखापर्यंत खर्च

वाणगाव येथील प्रसाद सावे यांनी एक एकर क्षेत्रात ऑर्किडच्या लागवडीचा नावीन्यपूर्ण प्रयोग  करण्याचा विचार केला. त्यासाठी पुणे येथून ४० हजार रोपांची खरेदी करून डिसेंबर २०१९ मध्ये लागवड केली. या रोपांना शेडनेट लागते. मिरचीसाठी असलेले पॉलिहाऊस त्यांनी या रोपांना दिले. रोपांना नारळाची साल लागते. एका बेडवर चार लाइन बांधणी करावी लागते. सॉगिंग सिस्टीम, आरोवॉटर टँक बसवली. एक एकर जागेसाठी ८० लाखापर्यंत खर्च केला. त्यानंतर गणपतीपासून ऑर्किडच्या झाडांना फुले येण्यास सुरुवात झाली. दरम्यान या उत्पादनाला टाळेबंदीचा परिणाम सोसावा लागला. ऑर्किडच्या एका झाडाला पहिल्या वर्षांला ६ ते ७ फुले येतात. त्यांनतर ती संख्या वाढत जाऊन ३० पर्यंत जाते.

ऑर्किड लागवड अत्यंत खर्चीक आहे. मला केतखाडी येथे एक एकर शेतीत ऑर्किड लागवडीसाठी ८० लाखांचा खर्च आला आहे. शासनाने सबसिडी उपलब्ध करून  दिली तर जिल्हय़ात लागवडीचे क्षेत्र वाढू शकते.
– प्रसाद भानू सावे, केतखाडी, उत्पादक

ऑर्किड लागवड साहित्याच्या अनुदानासाठी लक्ष्यांकांची मागणी जिल्हास्तरावरून आयुक्तालय पुणे यांच्याकडे करण्यात आली आहे.
– संतोष पवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

Story img Loader