पालघर साधू हत्याकांडाचा तपास आता सीबीआयकडे सोपवला जाणार आहे. राज्य सरकारने यासाठी तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र सरकारने तपास हस्तांतरणाला आपली हरकत नसल्याचे सांगितले असून तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर केले आले. राज्य सरकारच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. भाजपाचे आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी या राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुखांचा उल्लेख करत महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्यांच्या टीकेला काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Palghar Mob Lynching Case : जे नामर्दांच्या सरकारला जमलं नाही ते ‘हिंदूधर्मरक्षक देवेंद्र फडणवीस’ यांनी करून दाखवलं – आचार्य भोसले

“ नामर्द सारखा शब्द वापरुन यांच्याकडे अध्यात्मिक विचार नाही हे पुन्हा सिद्ध झालेच. परंतु पालघर साधुंच्या हत्येची चौकशी सीबीआय कडे सोपविण्याच्या निर्णयाचे स्वागत करुन स्वतःच्याच सरकारला व गृहमंत्र्यांना असक्षम ठरवत आहोत हा सारासार विचार ही या महाविद्वानांकडे नाही. धन्य आहे!” असं सचिन सावंतांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

तर, “जे नामर्दांच्या सरकारला जमलं नाही ते ‘हिंदूधर्मरक्षक देवेंद्र फडणवीस’ यांनी करून दाखवलं! पालघर साधू हत्याकांडाची केस सीबीआयकडे वर्ग करून गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस आपल्या धर्माबद्दल किती जागरूक आहेत. हे आज सगळ्या हिंदूंना समजलं. नाहीतर समस्त हिंदू समाजाचा तळतळाट भोगणाऱ्या उद्धव ठाकरे आणि अनिल देशमुख यांची काय दुर्देशा झाली आहे हे आज सगळा देश पाहतोय.” अशा शब्दांमध्ये भाजपा आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी टीका केली होती.

या घटनेनंतर आचार्य तुषार भोसलेंनी ही केस सीबीआयकडे द्या, ही मागणी सातत्याने केली होती आणि ठाकरे सरकारविरोधात मंत्रालयासमोर आंदोलन देखील केले होते.

हेही वाचा : पालघर साधू हत्याकांड तपास सीबीआयकडे जाणार; नारायण राणेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

या प्रकरणात याआधी साधारण २०० लोकांना अटक करण्यात आली होती. पुढे नोव्हेंबर २०२२ मध्ये अटक करण्यात आलेल्या ५८ जणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. तर डिसेंबर महिन्यात यातील ४७ आरोपींना ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. याआधी आरोपींविरोधात ठोस पुरावे गोळा करण्यासाठी सीआयडीने ८०८ संशयितांची चौकशी केली होती. तसेच १०८ साक्षीदारांचा जबाब नोंदवला होता.

नेमकं प्रकरण काय आहे? –

१६ एप्रिलच्या २०२२ रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी २०० जणांना अटक केली होती. यातील ११ आरोपी अल्पवयीन होते. तसेच या हत्याप्रकरणात पाच पोलिसांचे निलंबन तर ३० हून पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palghar mob lynching case congress leader sachin sawants reply to acharya bhosles criticism msr