चर्चा अंतिम टप्प्यात; पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून संकेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालघर : पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप यांच्यात युती आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये आघाडी होण्याची शक्यता आहे. नगर परिषदेत सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेसोबत भाजपची युती करण्यासाठी मुंबईमध्ये बैठका सुरू असून युती करण्यास वरिष्ठ पातळीवरून अनुकूलता असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी यांच्यामध्ये आघाडी करण्याच्या दृष्टीने अंतिम टप्प्यात बोलणी सुरू आहेत. यामुळे पालघरमध्ये युती विरुद्ध आघाडी असा थेट सामना रंगण्याची शक्यता असली तरीदेखील राजकीय आकांक्षा असलेल्या मंडळांतर्फे स्वतंत्र अपक्ष पॅनल किंवा बंडखोरी करण्यासाठीची छुपी तयारी सुरू आहे.

पालघर नगर परिषदेच्या २८ जागांसाठी शिवसेनेतर्फे सर्व जागांवर निवडणूक लढवण्याची केली तयारी असली असून या जागांसाठी ९० इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. या इच्छुकांसह नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक सात महिला उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी पालघरमध्ये निरीक्षकांमार्फत घेण्यात आल्या. भाजपमधील इच्छुकांच्या मुलाखती काल सायंकाळी घेण्यात आल्या असून युतीसंदर्भात चर्चा करण्यासाठी शहरातील भाजपमधील पदाधिकारी मुंबईला गेले आहेत. यापूर्वी भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या समवेत पालघरच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या बैठकीत पालघरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी युतीमध्ये सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. भाजप कार्यकर्त्यांनी पालघरमधून १४ जागांची मागणी केली असली तरीदेखील नऊ  ते १० जागांवर समाधान मानून या दोन पक्षांमध्ये युती होण्याची शक्यता आहे.

उमेदवारी अर्ज भरण्यास रीघ

लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर नगर परिषद निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक असून यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. एक अर्ज भरण्यास एक ते दोन तासांचा अवधी लागत आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी सायबर कॅफेमध्ये गर्दी केली असून काही पक्षांनी आपल्या कार्यालयात यासाठी स्वतंत्र दालने उघडली आहेत. एकीकडे युती-आघाडीची बोलणी सुरू असताना सर्व प्रमुख पक्षांनी सर्व २८ जागांसाठी आपल्या इच्छुकांचे उमेदवारी ऑनलाइन अर्ज भरण्याचे पसंत केले आहे. युती आणि आघाडी यांचे ‘ए’-‘बी’  फॉर्म अर्ज ७ मार्च रोजी सादर केले जाणार  आहेत.

स्वतंत्र ‘नमो’ पॅनल

भाजपमधील काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांना नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची प्रबळ इच्छा असून युतीच्या वाटाघाटीत भाजपाला योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्यास काही भाजप कार्यकर्त्यांमार्फत स्वतंत्र ‘नमो’ पॅनल निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेकडे इच्छुकांची मोठी यादी असून काही ठिकाणी शिवसेनेचे इच्छुक उमेदवाराना संधी न मिळ्याल्यास ते अन्य पक्षातून निवडणूक लढवण्याचे किंवा बंडखोरी करून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

आघाडीचा निर्णय उद्या

पालघर नगर परिषदेमध्ये गेल्या निवडणुकीत १० जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असावा यावर काँग्रेस व बहुजन विकास आघाडीची सहमती झाली  आहे. या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा जवळपास पूर्णत्वास आली असून एक-दोन जागेचा तिढा येत्या काही दिवसांत मार्गस्थ होईल, असे अपक्षांच्या आघाडीच्या वाटाघाटीत सहभागी होणाऱ्या सदस्यांचे म्हणणे आहे. या आघाडीमध्ये जनता दल आणि भारिप महासंघाला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून बुधवारी अंतिम निर्णय होईल.