-नीरज राऊत

भात बियाणाच्या खरेदी, पिकावरील नियंत्रण व नियोजन करणे तसेच भाताची विक्री किफायतशीर व सुलभ पद्धतीने करण्यासाठी जिल्ह्यामध्ये एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धती राबवण्यात येत असून ‘एक गाव, एक समूह-गट, एक वाण’ अशा पद्धतीने भात लागवड पद्धतीला पालघरचे कृषी विभाग चालना देत आहे. जिल्ह्यातील दीडशे गावांमध्ये अशा पद्धतीने लागवड करण्याचा प्रयत्न असून याकामी शेतकरी उत्पादक कंपन्या व सेवाभावी संस्थांची मदत घेण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात 15 हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली जाते. यंदा झालेल्या टाळेबंदीच्या वातावरण हे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत सर्वसामान्य शेतकऱ्यांना भात बियाणे खरेदी करण्यासाठी त्रासदायक ठरत असल्याने या विशेष पद्धतीचे अवलंब करण्याचे आवाहन पालघरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे यांनी केले आहे.

या व्यवस्थापन पद्धती अंतर्गत गावकऱ्यांनी किंवा समूह गटाने गरवे किंवा हळव्या जातीचे एकच भाताचा वाण निवडल्यानंतर कृषी विभागाला कळवायचा आहे. त्या बियाणाच्या उपलब्धतेनुसार कृषी विभाग संबंधित भात बियाणं दुकानदार किंवा वितरकाकडून हे बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर वाटप करण्याचे प्रयत्न करीत आहे. या पद्धतीला यशवंती शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर तालुक्यामध्ये आरंभ झाला किफायतशीर दरामध्ये व वाहतुकीचा कोणताही खर्च न होता शेतकऱ्यांना शाश्‍वत बियाणे घरपोच मिळणार आहे.

एका समूह गटाने किंवा गावाने एकच वाण लावल्याने भात पिकाची वाढ एकत्रित होऊन पीक एकाच वेळी तयार होणार असल्याने पिकावर आवश्‍यकतेनुसार फवारणी किंवा रोग- कीड नियंत्रण ठेवण्यासाठी सोयीचे पडणार आहे. त्याचबरोबर पीक तयार होण्याचा कालावधी एकत्रित होत असल्याने कापणीसाठी यांत्रिकी पद्धतीचा अवलंब करणे सहजशक्य होणार आहे. यामुळे शेतकऱ्यां ला भेडसावणाऱ्या अनेक समस्यावर मार्ग निघणार असून एका समूहाकडे एकाच जातीचे मोठ्या प्रमाणात भात उपलब्ध असल्याने त्याची विक्री करणे सोयीचे ठरणार आहे. एकाच जातीचे बियाणे लावल्यास शेतकऱ्यांना उत्पादनाची खात्री होणार असून सत्यदर्शक बियाणे असल्यास पुढील तीन वर्षासाठी असे बियाणे शेतकरी पुन्हा वापरू शकतात. शिवाय समूहामध्ये पिक विमा भरण्यासाठी सोयीचे होणार असून भात पिकासाठी आवश्यकतेनुसा भात पिकासाठी संतुलित प्रमाणात खताचा वापर करणे शक्य होणार आहे

सध्या बाजारामध्ये 90 ते 100 भात बियाणे उपलब्ध असून त्यांचा तयार होण्याच्या वेगवेगळा कालावधी असल्याने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जावे लागते. बारीक दाणे असणाऱ्या जातींना शेतकरी प्राधान्य देत असून स्वतःच्या वापरासाठी इतर जातींची लागवड करत असल्याचे निदर्शनास आले आहे. भट लागवडीची अशी पद्धत बंद करून एकात्मिक पीक व्यवस्थापन पद्धतीवर लागवड करण्याचे प्रयत्न तालुका कृषी अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या मदतीने कृषी विभागाने हाती घेतले आहे.

खरिपात देखील भाजीपाला लागवड
करोना विषाणूचा संसर्गाच्या परिस्थितीत पालघर व डहाणू तालुक्यातील काही बागायतदारांनी वसई- विरार महानगरपालिका क्षेत्रात विविध रहिवाशी संकुलांमध्ये थेट भाजीपाला पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. हे काम सुरू राहावे त्यादिवशी यंदा खरिपामध्ये देखील काही प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले. भाजीपाल्याचा येथे तयार होणारा भात महानगरपालिका व शहरांमध्ये थेट विक्री करून शेतकरी ते ग्राहक साखळी निर्माण करण्यासाठी जिल्हा कृषी विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगण्यात आले.