राज्यात सध्या जिल्हा परिषद पोटनिवडणुकांच्या निकालांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या निवडणुकांमध्ये सर्वच पक्ष आपापली ताकद आजमावून पाहात आहेत. अकोला, धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे आज निकाल लागत असताना अनेक ठिकाणी राजकीय पक्षांचे आडाखे चुकल्याचं देखील दिसून येत आहे. काही मतदारसंघात तर सत्ताधाऱ्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागत आहे. असाच एक धक्कादायक निकाल पालघरमध्ये लागला आहे. गेल्या ८ वर्षांपासून पालघरचा गड आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या राजेंद्र गावित यांना आपल्याच मुलाला तिथून निवडून आणण्यात अपयश आल्याचं निकालातून दिसून आलं आहे.
पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटामधून राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना उमेदवारी देण्यात आली होती. राजेंद्र गावित यांचं पालघरमधील प्रस्थ सर्वश्रुत असल्यामुळे रोहित गावित यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, त्यांना अनपेक्षितपणे पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपाचे उमेदवार पंकज कोरे यांनी रोहित गावित यांचा पराभव करत एक प्रकारे राजेंद्र गावितांनाच पराभूत केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
राजेंद्र गावित यांनी आपल्या मुलाला पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र, यावेळी तिकिटासाठी शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुशील चुरी इच्छुक होते असं सांगितलं जात आहे. त्यांना उमेदवारी नाकारून रोहित गावित यांना उमेदवारी देणयात आल्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेत नाराजी असल्याचं देखील सांगितलं जात आहे. चुरी यांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचाच फटका गावित यांना बसल्याचं आता बोललं जात आहे.
पालघरमघ्ये २०१८ साली दिवंगत खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि ती जिंकून ते लोकसभेत गेले. मात्र, २०१९मध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आल्यामुळे राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवसेनेच्या तिकिटावर ते पालघर लोकसभा निवडणूक जिंकले. राजेंद्र गावितांचं राजकीय वजन पाहाता त्यांच्या मुलासाठी ही निवडणूक सोपी असल्याचं बोललं जात होतं. पण रोहित गावित यांचा पराभव झाला असून भाजपाचे पंकज कोरे यांनी वणई गटातून निवडणूक जिंकली आहे.