पालघर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी मोहन देसलेंना एक लाखाची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली . शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी तक्रारदार शिक्षकाकडून ३ लाख रुपये लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम दोन लाखांवर आली. यापैकी एक लाखाचा हप्ता स्वीकारत असताना मोहन देसलेंना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी संध्याकाळी ६.३० च्या दरम्यान ही कारवाई केली.
तक्रारदार शिक्षकाचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात होते.त्यांची शिक्षक मान्यता व वेतन मान्यता देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने पालघरच्या माध्यमिक शिक्षण विभागाला नोव्हेंबर २०१८ मध्येच आदेश दिले होते. तो आदेश मिळविण्यासाठी तक्रारदार शिक्षक हे खेटे घालत होते. मात्र महिना उलटूनही आदेश मिळत नसल्याने त्यांनी याबाबतीत देसले यांना जाब विचारला. त्यावेळी शिक्षणाधिकारी मोहन देसले यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला बगल देत तक्रारदार शिक्षकाकडून ३ लाख रुपये लाच मागितली. त्यानंतर ही रक्कम तडजोड करून २ लाख करण्यात आली. यासंदर्भातली तक्रार शिक्षकाने २८ डिसेंबरलाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली.
संबंधित तक्रारीची लाचलुचपत विभागाने पडताळणी केल्यानंतर सोमवारी १ लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याचे ठरले. त्यानुसार लाचलुचपत विभागाने शिक्षणाधिकारी कार्यालयाजवळ सापळा रचला. शिक्षणाधिकारी देसले याने ही लाच रक्कम तक्रारदार शिक्षक यांना कार्यालय आवारातील गाडीच्या डिक्कीत ठेवण्यास सांगितले.ही रक्कम शिक्षकाने ठेवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीजवल जाऊन शिक्षण अधिकारी देसले यांना अटक केली.