पूर्णा येथे बुद्ध विहार हे धम्म प्रचार-प्रसाराचे महत्त्वाचे केंद्र आहे. मराठवाडय़ातील या एकमेव बुद्धविहारात प्रथमच पाली भाषेचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे बुद्ध धम्माचे ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाली भाषेचा अभ्यास करणे आवश्यक आहे,  असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे प्रदेशसरचिटणीस सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केले.
पूर्णा येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. बोधिसत्त्व डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक आणि बुद्ध विहार समितीतर्फे बुद्ध विहारात भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली १३ जूनपर्यंत इयत्ता पाचवी, आठवी, नववी, बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पाली भाषेचे ज्ञान व्हावे, म्हणून प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. या निमित्त बुद्ध विहारात विशेष कार्यक्रम झाला. भदंत प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो यांची उपस्थिती होती.
भदंत उपगुप्त महाथेरो धम्मदेसनेत म्हणाले की, विहारात २ मेपासून पाली भाषेचा वर्ग सुरू झाला असून, दररोज सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत विद्यार्थ्यांना पाली भाषेसंदर्भात अभ्यास, वंदना, याचना, विपश्यना आदींची शिक्षण दिले जाते. भदंत प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो यांनी विहारात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘त्रिपिटक’ हा बुद्ध धम्मातील ग्रंथ पाली साहित्यामध्ये महत्त्वाचा असून पाली भाषा जागरुकपणे शिकली पाहिजे. ती एकसारखी वाचावी, पाली भाषेचे मुखोद्गत पठण करावे, असे सांगितले. भदंत पय्यानंद, उत्तम खंदारे, अशोक धबाले, देवराव खंदारे, मंचक खंदारे, राम कांबळे, यादवराव भवरे, निरंजना महिला मंडळाच्या शोभाबाई कांबळे, कांताबाई साळवे आदींची उपस्थिती होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा