कराड : गुलाल- खोबऱ्याची उधळण अन् नाईकबाच्या नावानं चांगभलंचा गजर करीत भक्तिमय वातावरणात बनपुरी (ता. पाटण) श्री नाईकबा देवाचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्यानिमित्ताने नाईकबा डोंगरमाथ्यावर भक्तीचा महासागर लोटला होता.

महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक यात्रेसाठी दाखल झाले होते. नैवेद्याचा कार्यक्रम संपल्यानंतर भाविक सासनकाठ्यासह देवदर्शनासाठी आले होते. पायरी व घाटमार्ग त्यामुळे गजबजून गेला होता. रात्री डोंगरमाथ्यावर भाविक मुक्कामी होते. पहाटे पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. दूरवरून आलेल्या सासनकाठ्याही त्यामध्ये सामील झाल्या होत्या.

गुलाल- खोबऱ्याची उधळण करत निघालेल्या पालखी सोहळ्यास भक्तांचा सागर लोटताना ‘चांगभलं’च्या जयजयकाराने अवघा डोंगर परिसर दुमदुमून गेला होता. पालखी सोहळ्यानंतर देवदर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. नाईकबाचा डोंगर गुलालाने न्हाऊन गेला होता. या वेळी देवदर्शनासाठी भाविकांची भलीमोठी रांग लागली होती.

मेवा- मिठाई, खेळणी, सौंदर्य प्रसाधने आदींची खरेदी करून भाविकांचा परतीचा प्रवास सुरू झाला. रात्रीच्या जागरणाने यात्रेकरूंनी कराड- ढेबेवाडी रस्त्यावरील मोकळ्या शिवारात झाडाखाली विश्रांतीसाठी ठिय्या मांडला होता. त्यानंतर हे यात्रेकरू पुढे मार्गस्थ झाले.

दरम्यान, यात्रास्थळी पाणीटंचाईची झळ पोहोचू नये, यात्रा कमिटी, नाईकबा देवस्थान न्यास व महेश पाटील आणि कंपनी व ग्रामपंचायतीने सुयोग्य नियोजन केले होते. अनेक ठिकाणांहून एसटी बसेसची सोय होती. ढेबेवाडी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता.