एकनाथ-भानुदासाचा जयघोष आणि पांडुरंगाला भेटण्याची आस घेऊन हजारो वारकऱ्यांसह एकनाथ महाराजांच्या पालखीने बुधवारी पंढरपूरला प्रस्थान ठेवले. भागवत धर्माची गुढी पंढरपूरला नेण्यासाठी आसुसलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी व बीड जिल्हय़ांतील सुमारे १० हजार भाविक बुधवारच्या पालखी सोहळय़ात सहभागी झाले. भक्तिरसाने चिंब, टाळमृदुंगाच्या गजरात व नाथमहाराजांच्या भारुडाच्या संगतीने पालखी सोहळय़ाची रंगत चांगलीच वाढली.
पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी पैठण येथे भाविकांचा मोठा मेळा जमला होता. ही दिंडी ११ दिवसांच्या मुक्कामाची असून १९ दिवसांत ती पंढरपूरला जाते. बीड, सोलापूर, नगर व औरंगाबाद या जिल्हय़ांतून पालखीचा प्रस्ताव होतो. चनकवाडी, हदगाव, लाडजळगाव, मुंगुसवाडी, राक्षसभुवन, रायमोहन, पाटोदा, डिघोळ, खेर्डा, दांडेगाव, परंडा या भागातून वारीचा प्रवास होतो. २७ जुलैला पंढरपूरला नगर प्रदक्षिणा होते. या ठिकाणी रिंगण सोहळा होतो. विठ्ठलनामात दंग वारकऱ्यांसाठी हा सोहळा महत्त्वाचा असतो. एकनाथमहाराजांच्या पालखीचे ५ ठिकाणी रिंगण होते. मिडगाव, पारगाव, गुमरे, नागरडोह आणि कवेदंड येथे रिंगण, तर पंढरपूरला उभे रिंगण होते. पालखी दर्शनासाठी माजी आमदार संजय वाकचौरे, नगराध्यक्ष दत्ता बोर्डे यांसह नगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.
दिंडीच्या काळात मोठा पाऊस व्हावा, असे अपेक्षित असते. पेरण्या झाल्यानंतर पिकांची काळजी बा विठ्ठला तू घे, असे साकडे घालत शेतकरी पांडुरंगाच्या भेटीला निघाला आहे. तुलनेने या वर्षी वारीतली संख्या काहीशी घटल्याचे सांगितले जाते. त्याला दुष्काळी परिस्थिती कारणीभूत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palkhi of eknathmaharaj departure paithan district for pandharpur