शिवजयंतीची मिरवणूक पाहून घरी परतताना झालेल्या अपघातात शहराजवळील पळसे येथील एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर संशयितास त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी सुमारे दोन तास नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक रोखून धरण्याचा प्रकार शनिवारी घडला. या आंदोलनानंतर पोलिसांनी अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करीत एकास अटक केली आहे.
पळसे येथील सचिन दत्तात्रय गायखे (२९) हे मोटारसायकलवरून आपल्या सहा वर्षांच्या निखिल या मुलासह नाशिक रोड येथे शिवजयंतीची मिरवणूक पाहण्यास आले होते.
मिरवणूक संपल्यानंतर घरी परत जात असताना शिवाजी उद्यानाजवळ सिन्नरहून नाशिककडे येणाऱ्या स्कॉर्पिओची धडक मोटारसायकलला बसली. त्यात निखिल गायखे ठार झाला, तर दत्तात्रय गायखे जखमी झाले. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी दोन तास नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक रोखून धरली. स्कॉर्पिओचालकावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी होती. पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलिसांनी स्कॉर्पिओचालक नितीन गायधनी (२२, रा. पळसे) याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

Story img Loader