पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ हा सांगली लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. काँग्रेसचे नेते विश्वजित पतंगराव कदम हे पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. या मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगाव या दोन तालुक्यांचा समावेश होतो. २००८ मध्ये विधानसभा मतदारसंघांची फेरमांडणी झाल्यानंतर पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. त्याआधी हा मतदारसंघ वांगी-भिलवडी या नावाने ओळखला जात. या मतदारसंघात माजी मंत्री स्व. डॉ. पतंगराव कदम यांचे वर्चस्व होते. तब्बल सहावेळा या मतदारसंघातून पतंगराव कदम हे विधानसभेवर निवडून गेले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पूत्र विश्वजित कदम यांची पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघावर पकड आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपने अखेरच्या क्षणी संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी मागे घेत विश्वजित कदम यांना पुढे चाल दिली होती. यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. शिवसेनेने या ठिकाणी जिल्हा प्रमुख संजय विभुते यांना उमेदवारी दिली. मात्र, ही निवडणुक चुरशीची तर झाली नाहीच, पण नाराज झालेल्या संग्रामसिंह देशमुख गटाकडून नोटाला झालेले मतदान लक्षवेधी होते. काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांना १७१४९७ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नोटाला २०६३१ मते मिळाली. शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांना ८९७६ मते मिळाली.
हेही वाचा : हरियाणातील पराभवानंतर असदुद्दीन ओवेसींची काँग्रेसवर टीका; म्हणाले, “स्वतःच्या नाकर्तेपणामुळे…”
भाजपाचे संग्रामसिंह देशमुख विरुद्ध काँग्रेसचे विश्वजित कदम
आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाचे संग्रामसिंह देशमुख विरुद्ध काँग्रेसचे विश्वजित कदम असा सामना रंगणार आहे. भाजपकडून संग्रामसिंह देशमुख यांनी पळूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली होती. २०२४ मध्ये झालेल्या सांगली लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील यांचा पराभव केला. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पळूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार पाटील यांच्यापेक्षा ३६ हजार १८२ मते अधिक मिळाली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना १३ हजार ८५० मते मिळाली. अपक्ष विशाल पाटील यांनी निवडून आल्यानंतर काँग्रेसला समर्थन दिले आहे. विशाल पाटील यांच्या विजयात काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांनी महत्वाची भूमिका बजावली. आगामी पळूस कडेगाव विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्यासमोर काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांचे आव्हान कडवे आहे.