कोल्हापूर : “देशातील ४४ कोटींहून अधिक पॅनकार्ड ग्राहकांना आधारकार्डशी लिंक करण्याचा निर्णय प्राप्तीकर विभागाने घेतलेला आहे. या प्रक्रियेसाठी दरडोई १ हजार रुपयाचा जिजीया कर आकारला आहे. यामुळे देशातील जनतेवर ४४ हजार कोटींचा दरोडा पडणार असून, या विरोधात आवाज उठवण्यात यावा”, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली.
केंद्र सरकारने डिजिटल धोरणाच्या नावाखाली पॅनकार्ड धारक व्यक्तींना आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक केले आहे. यासाठी प्रत्येक पॅनकार्ड धारकास १ हजार रुपये खर्च येत आहे. याद्वारे केंद्र सरकार तब्बल ४४ हजार कोटी रुपयांचा दरोडा टाकत आहे. सध्या जनतेला कोणताही व्यवहार अथवा नोंदणी करत असताना आधारकार्ड व पॅनकार्ड असणे बंधनकारक करण्यात आलेला आहे, असे राजू शेट्टी म्हणाले.
हेही वाचा – कोल्हापूर: आर्थिक कारणातून हातकंणगले तालुक्यात युवकाचा खून; जिवलग मित्रांची आत्महत्या
हेही वाचा – कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी तीन लाखांवर भाविक, सासनकाठ्या दाखल; आज मुख्य दिवस
तक्रारी नोंदवाव्यात
केंद्र सरकार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या जनतेकडून मोठ्या प्रमाणात कराची आकारणी करून महागाईच्या काळात जनतेचे कंबरडे मोडत आहे. या तुघलकी धोरणाविरोधात आवाज उठविण्यासाठी व जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याकरिता रविवारी (९ एप्रिल) #स्टॉपरॉबरी #stoprobbary हा संदेश ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाठवावा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना मेलद्वारे प्रतिक्रिया नोंदवाव्यात, असे शेट्टी म्हणाले.