महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह नीरा नदीपात्रात सापडला. त्यांनी सातारा पुणे मार्गावरील नीरा नदीपात्रात आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळाले नाही. शशिकांत घोरपडे १२ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या नातेवाईकांनी शिरवळ (ता खंडाळा) पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी युद्धपातळीवर शशिकांत यांची शोधमोहीम सुरु केली होती. शोधमोहिमेदरम्यान आज सकाळी त्यांचा मृतहेह नीरा नदीपात्रात आढळून आला.
हेही वाचा- जिल्हा प्रशासनाचा विसंवाद ; पुरंदर विमानतळाच्या ‘उड्डाणाला’ ब्रेक
शशिकांत घोरपडे हे बुधवारी दुपारी पुणे येथील कार्यालयातून बाहेर पडले होते. मात्र घरी आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी शोध सुरू केला. त्यांची गाडी बुधवारी शिवापूर टोलनाक्यावरून सातारा बाजूकडे गेल्याचे दिसत आहे. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तपासले असता शिरवळ निरा नदीपुलाचे होते. घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची गाडी शिरवळ पूलाजवळच्या हॉटेल समोर सापडली. त्यानुसार घोरपडे यांचे बंधू श्रीकांत घोरपडे यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात शशिकांत यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली होती.
हेही वाचा- ‘वीस पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नका’; पुण्यातील मावळात पालकांचे पाल्यासह आंदोलन
निरा नदीपात्रात भोर येथील भोईराज जल आपत्ती निवारण पथक,महाबळेश्वर ट्रेकर्स, सातारा पोलीस व राजगड पोलिसांनी युध्द पातळीवर शोधमोहीम राबविली. शशिकांत यांचे नातेवाईक या परिसरात थांबून होते. आज सकाळी मृतदेह शोध पथकाला आढळून आला.