पुणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्व धरणे तुडुंब भरली असताना त्याठिकाणी संततधार पावसामुळे बंडगार्डन येथून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग किंचित कमी झाला असला तरी त्यामुळे उजनी धरण झपाटय़ाने भरत चालले आहे. शनिवारी सायंकाळी धरणात ८३.७५ टक्के इतका पाणीसाठा होता. येत्या दोन दिवसात धरण शंभर टक्के भरण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, मागील दोन वर्षे बंद असलेला या धरणावरील १३ मेगॉवाट क्षमतेचा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे.
येत्या दोन दिवसांत उजनी धरण शंभर टक्के भरण्याचा अंदाज विचारात घेऊन धरणातून अतिरिक्त पाणी भीमा नदीत सोडण्याची तयारी जलसंपदा विभागाने हाती घेतली आहे. त्यामुळे पंढरपुरात नजीकच्या काळात पूर परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणात पाण्याची पातळी ४९६.०७२ मीटर इतकी होती तर एकूण पाणीसाठा ३०७३.५० दशलक्ष घनमीटर व उपयुक्त पाणीसाठा १२७०.६९ दलघमी होता. म्हणजे उपयुक्त पाण्याचा साठा ८३.७५ टक्के इतका होता. धरणातून दोन्ही कालव्यांवाटे पाणी सोडण्यात येत असून सायंकाळी या पाण्याचा विसर्ग २८०० क्युसेक्स होता. तर बोगद्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग ९५० क्युसेक्स होता. धरणात दौंड येथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग काल शुक्रवारी ७३ हजार ६३५ क्युसेक्स इतका होता. परंतु शनिवारी सायंकाळी तो कमी होऊन ६७ हजार ८०४ क्युसेक्सपर्यंत झाला, तर बंडगार्डन येथून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग ५२ हजार ६३८ क्युसेक्सवरून कमी करून १६०० क्युसेक्स
इतका होता.
पंढरीत पुराची भीती उजनी धरण शंभरीकडे.
पुणे जिल्ह्य़ातील जवळपास सर्व धरणे तुडुंब भरली असताना त्याठिकाणी संततधार पावसामुळे बंडगार्डन येथून सोडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग किंचित कमी झाला
First published on: 04-08-2013 at 06:06 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur afraid of flood ujani dam moves to 100 percent water stock