पंढरपूर : भीमा आणि नीरा खोऱ्यात पावसाचा जोर कायम आहे. वीर धरणातून मंगळवारी दुपारी चार वाजता पाण्याचा विसर्ग कमी केला, तर दुसरीकडे उजनी धरणातून चंद्रभागा नदीत पाण्याच्या विसर्गात थोडी वाढ केली आहे. हे पाणी चंद्रभागा नदीला येऊन मिळते. त्यामुळे चंद्रभागा नदी धोक्याच्या पातळीकडे पोहचली आहे. पूरसदृश स्थिती कायम आहे. शहरातील नदीकाठच्या झोपडपट्टीतील कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी दक्ष राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोलापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वरुणराजाने हजेरी लावली आहे. त्यामुळे ओढे, नाले भरून वाहत आहेत. तसेच पुण्यात पावसाचा जोर कमी-जास्त होत आहे. दौंड येथून ६७ हजार क्युसेक पाणी उजनी धरणात येत आहे, तर दुसरीकडे वीर धरणातून नीरा नदीत ५५ हजार क्युसेक पाणी सोडले आहे. हे पाणी नीरा नृसिंहपूर येथे नीरा आणि भीमा नदीचा संगम होतो तेथे येते. संगमातून पुढे पाणी भीमा अर्थात चंद्रभागा नदीत जाऊन मिसळते. संगम या ठिकाणी १ लाख ३१ हजार क्युसेक वेगाने पाणी वाहत आहे, तर उजनी धरण आणि संगम येथून आलेल्या पाण्याने चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी दुपारी ४ वाजता चंद्रभागा नदीतून १ लाख ३० हजार क्युसेक पाणी वाहत आहे. सोमवारी सोडलेले पाणी मंगळवारी नदीला आले आहे. त्यामुळे सर्व घाटांच्या पायऱ्यांवर पाणी आले आहे.

हेही वाचा : Shivaji Maharaj Statue : महायुतीत बेबनाव? देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींनी पोस्ट केला शिवरायांचा फोटो, म्हणाले..

शहरातील नदीकाठच्या झोपडपट्टीतील रहिवाशांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच जर पाण्याची पातळी रात्रीतून वाढली, तर इतर ठिकाणच्या नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. शहरात आणि विशेष करून नदीकाठच्या भागात पालिकेने दक्ष राहण्याचे आवाहन केल्याची माहिती पालिकेचे उपमुख्याधिकारी ॲड. सुनील वाळुजकर यांनी दिली आहे.

हेही वाचा : Narayan Rane : “शरद पवारांनी किती मंदिरं बांधली? राहुल गांधींचा तर…”, नारायण राणेंची बोचरी टीका

दरम्यान, या आधीदेखील पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. मात्र, त्या वेळेस पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन केल्याने पुराचे संकट टळले होते. सध्यादेखील पुण्यातून उजनीत येणारा विसर्ग बघून नियोजन केले जात आहे. असे असले, तरी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur chandrabhaga river flood situation heavy rain in bhima and nira river css