पंढरपूर : येथील चंद्रभागा नदी वाहती नसल्याने साचलेल्या पाण्यात शेवाळे, किडे, जलपर्णी आदीमुळे दूषित झाली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन दिवसांवर माघी एकादशी आहे. त्यानिमित्त वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. असे असले तरी अशा दूषित पाण्यात भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करत आहेत. मात्र या प्रकारावर प्रशासन आणि राजकीय मंडळी कानाडोळा करत आहेत.
जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर… जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. असा उल्लेख वारकरी संप्रदायात केला जातो. इथे आल्यावर चंद्रभागा स्नान, नगरप्रदक्षिणा, देवाचे दर्शन याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र गेली काही वर्षांपासून चंद्रभागा नदी ही दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. एक तर ही नदी वाहती नाही. उजनी धरणातून सोडलेले पाणी आणि कधी तरी पावसाचे प्रमाण वाढलेच तर नदी काही काळ वाहती होते.
त्यानंतर पात्रातील पाणी स्थिर आणि साठवलेले अशा स्वरुपात दिसून येते. त्यामुळे हे साठलेले पाणी दूषित होते. इथे येणारा भाविक स्नानाला आला की नदीची पूजा करून नारळ, फूल, ओटी भरतो. फाटके कपडे पाण्यात टाकून जातो. अशा या ना त्या कारणाने नदी पात्रात पाणी कमी आणि अशा प्रकारामुळे घाण होत आहे.
पंढरीत चार प्रमुख वारी आणि दर महिन्याच्या दोन एकादशी अशा २८ प्रमुख एकादशी असतात. या २८ एकादशीला भाविक स्नान करतोच. मात्र त्या वेळी नदी पात्रात पाणी कमी आणि घाण जास्त असेच प्रकार असतात. आता वारकरी संप्रदायातील प्रमुख यात्रेपैकी एक माघी यात्रेचा ८ फेब्रुवारी रोजी मुख्य दिवस आहे. मात्र सध्याच्या घडीला नदी पात्रात जेमतेम पाणी आहे. ते पण दूषित, वास्तविक पाहता यात्रेसंदर्भात प्रशासनाच्या बैठका होतात. मात्र याबाबत नुसती चर्चा होते. प्रत्यक्षात कारवाई होत नाही. स्थानिक आमदारांचे याकडे दुर्लक्ष आहे. तर भाविक मोठ्या श्रद्धेने स्नान करतात आणि जातात. त्यामुळे पालकमंत्री यात लक्ष घालून कायमस्वरूपी प्रश्न सोडवतील का, असा सवाल स्थानिक नागरिकांचा आहे.