पंढरपूर : वारकरी संप्रदायातील महत्त्वाची मानली जाणाऱ्या चैत्री यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीत मुबलक आणि स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घेऊन नियोजन करावे. जेणेकरून दर्शनाला येणाऱ्या भाविकांना स्नान करता येईल. तसेच या कालावधीत नदीचे पाणी कावडीतून घेऊन जातात. त्यामुळे पाण्याचे योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या आहेत. चैत्री यात्रेचा मुख्य दिवस म्हणजे चैत्र एकादशी ८ एप्रिल रोजी आहे.

चैत्री यात्रेला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक यांसह राज्यातून भाविक दरवर्षी पंढरीच्या वारीला येतात. या पार्श्वभूमीवर चैत्री यात्रा नियोजनाबाबत येथील प्रांत कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीस तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जी.एस. भोळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या वेळी प्रांताधिकारी इथापे म्हणाले, पंढरपुरात चैत्री यात्रा कालावधीत तीन ते चार लाख भाविक येतात. या यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. पालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणे तत्काळ काढावीत. मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. नदीपात्रात कोणतीही खासगी वाहने जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. या यात्रा कालावधीत भाविक कावडीतून पाणी शिखर शिंगणापूरला घेऊन जातात. तसेच माघी यात्रेला नदी पात्रात गाळ, घाण पाणी होते. ही बाब ध्यानात घेऊन प्रांताधिकारी यांनी पाटबंधारे विभागाल नदी पात्रात मुबलक व स्वच्छ पाणी राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.

दर्शनरांगेतील भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यासाठी मंदिर समितीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. आरोग्य विभागाने तज्ज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. चैत्री यात्रा उन्हाळ्याच्या दिवसात असल्याने अन्नपदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता असल्याने अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, उपवासाचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करावी. महावितरण विभागाने अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा करावा. अशा सूचना प्रांताधिकारी इथापे यांनी दिल्या. यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल, हातपंपांची पाणी तपासणी करण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांनी सांगितले.

Story img Loader