देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची. पंढरपुरात सकाळी ८ वाजता नियमाप्रमाणे पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. या मतदारसंघाचा आकार आणि एकूण मतदारांची संख्या पाहाता दुपारपर्यंत पंढरपूर पोटनिवडणुकीचा निकाल हाती येण्याची शक्यता आहे. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात इथे थेट सामना पाहायला मिळत आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे पंढरपुरात पोटनिवडणूक लागली. त्यामुळे आता भारत भालके यांचेच पुत्र भगीरथ भालके यांना पंढरपूरची जनता साथ देते, की डाव उलटवून समाधान अवताडे यांच्या गळ्यात विजयाची माळ असेल, याची उत्सुकता सध्या लागली आहे. त्याशिवाय, स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांच्यामुळे ही निवडणूक चौरंगी झाल्याचं दिसून आलं.
भाजपा वि. महाविकासआघाडी थेट सामना!
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत एकूण ३ लाख ४० हजार ८८९ मतदार असून एकूण ५२४ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती. गेल्या महिन्याभरात करोनाच्या निर्बंधांमध्ये देखील पंढरपूरसाठी या निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच सभेमध्ये झालेली गर्दी आणि करोना नियमांची पायमल्ली हा चर्चेचा आणि राजकारणाचा देखील विषय ठरला होता. त्याचवेळी भाजपाकडून देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेत्यांनी पंढरपूरमध्ये सभा घेतल्या होत्या. दोन्ही बाजूंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आल्यामुळे या जागेच्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
West Bengal Election 2021 Result Live Updates: सुरुवातीच्या कलांमध्ये तृणमूल आघाडीवर
३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न ठरला मुद्दा!
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातल्या ३५ गावांच्या पाण्याचा प्रश्न हा मुद्दा यंदाच्या निवडणुकीत विशेष चर्चेचा आणि राजकीय सभांचा विषय ठरला होता. त्याशिवाय, राज्यातील करोनाच्या संकटाची हाताळणी हा मुद्दा भाजपाकडून मोठा करण्यात आला होता. रेमडेसिविर, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसींचा तुटवडा आणि पुरवठा या मुद्द्यांवरून दोन्ही बाजू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचं दिसून आलं.
निवडणूक काळात पंढरपुरात करोना वाढला!
पंढरपूरमध्ये १ एप्रिल रोजी केवळ ४६ रुग्ण आढळून आले होते. मात्र पुढे १७ एप्रिल रोजीच्या मतदानाअगोदर प्रचार काळापासून यामध्ये वाढ होऊ लागल्याचे दिसून आले. तालुक्यात १५ एप्रिल रोजी – १७१, १६ एप्रिल – २४८, १७ एप्रिल – २१०, २३ एप्रिल रोजी ३०९, २४ एप्रिल – ३१०, २५ एप्रिल -३३३, २६ एप्रिल – २९९ अशी रोज रुग्णसंख्या वाढताना दिसून आली. मार्च महिन्यात तालुक्यात केवळ ७०५ रुग्ण आढळले होते. हीच संख्या एप्रिल महिन्यात २६ एप्रिलपर्यंत थेट ३१४६ वर पोहोचली. मार्च महिन्यात संसर्गाचा दर हा ७.०६ टक्के होता. तो एप्रिलमध्ये वाढून १४.९५ टक्क्यांवर गेला.