पंढरपूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कॅरिडॉरच्या माध्यमातून विविध विकासकामे करणार आहे. मात्र, याबाबत काही गैरसमज पसरवला जात आहे. वास्तविक स्थानिकांची मते जाणूनच विकासकामे केली जाणार आहेत. आणि याबाबत नागरिक, व्यापाऱ्यांची मते जाणून घेतली असून, चुकीच्या पद्धतीने कोणावर अन्याय होणार असेल, तर मी नागरिकांच्या पाठीशी उभा राहीन, अशी भूमिका आमदार समाधान आवताडे यांनी मांडली.

येथील कॅरिडॉरबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला पंढरपूर शहर आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील रहिवासी, नागरिक आणि व्यापारी यांना निमंत्रित केले होते. गेल्या काही वर्षांपासून पंढरपूर कॅरिडॉर विषय चर्चेत असून, मंदिर परिसरातील बाधित लोकांनी विरोध दर्शवला होता. तर काही स्थानिक समर्थन करत आहेत. या वेळी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आपली मते नोंदवली. त्यानंतर आवताडे यांनी, कॅरिडॉरबाबत प्रशासनाकडून कोणताही आराखडा आलेला नसल्याचे सांगून सभागृहात विषय चर्चेला आला, तर लोकांचे मत माहिती असावे यासाठी बैठक घेतल्याचे स्पष्ट केले.

कॅरिडॉर करताना कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने करणे गरजेचे आहे, अशी माझी भूमिका आहे. पंढरपूरकरांचा याला विरोध आहे, असे माध्यमांनी म्हणू नये. केवळ काही भागांतील नुकसान होत असल्याची तक्रार असल्याने त्याचा योग्य विचार करू. मात्र, याचा अर्थ त्या प्रकल्पालाच पूर्णतः विरोध असल्याचे पसरवू नये, असेही आ. आवताडे म्हणाले. विकासात्मक गोष्टीला विरोध न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Story img Loader