पंढरपूर : सलग सुटी, दिवाळी, वर्षाअखेर अशा सुट्यांच्या काळात पर्यटनस्थळ, गड किल्ले किंवा एखाद्या तीर्थस्थळ इथे जाऊन आनंद घेतला जातो. मात्र गेल्या काही वर्षांपासून नागरिकांचा ओढा आता तीर्थक्षेत्री जाण्याकडे वळू लागला आहे. त्यात पंढरीला अधिकची पसंती दिसून येते. इथे येण्यासाठी दळणवळण सोयीचे आणि सुलभ आहे. त्यामुळे यंदाही नाताळाच्या सुटीत पंढरपूर हाऊसफुल्ल झाले आहे. पर्यटनाच्या ठिकाणी आनंद मिळतो पण मनाला शांती, समाधान हे तीर्थाटन केल्याने आणि त्यात विठुरायाच्या दर्शनाने मिळते म्हणून आम्ही येतो असे पर्यटकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>> Manikrao Koakate : नाशिकच्या पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीचा दावा? माणिकराव कोकाटेंचं मोठं विधान; म्हणाले, “पालकमंत्रिपद…”

नाताळची सुटी ही कोकण किंवा अन्य पर्यटनस्थळे पाहण्यासाठी एकीकडे गर्दी होत असताना तीर्थक्षेत्र पंढरपूरही गर्दीने हाऊसफुल्ल झाले आहे. साधारणपणे सुटी एन्जॉय करण्याऱ्या गावात जाण्याचा कल किंवा पसंती असते. मात्र यंदाच्या नाताळच्या सुटीत पंढरीत भाविकांसह पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. येथील भक्त निवास, धर्मशाला, लॉज भाविक, पर्यटकांनी फुलून गेले आहेत. येथे येऊन मुक्काम करून श्री संत कैकाडी महाराज मठ, श्री संत तनपुरे महाराज मठ, गोपाळपूर विष्णूपद या ठिकाणी आवर्जून जाण्याकडे भाविकांचा कल वाढला आहे. त्याचबरोबर सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्याची ओढही असते. ज्यांना आषाढी, कार्तिकी यांसारख्या यात्रेला येण्यास जमत नाही असेही काही भाविक दर्शनासाठी आवर्जून आले आहेत. गेल्या तीन दिवसांत भाविकांनी विठुरायाच्या दर्शनाला गर्दी केली होती.

हेही वाचा >>> Devendra Fadnavis : “अकेला देवेंद्र क्या करेगा? पण त्यांना त्यावेळी…” सुप्रिया सुळेंच्या टीकेवर फडणवीसांचा तीन वर्षांनी पलटवार

साधारणपणे २ ते ३ तास दर्शनाला लागत होते. या वेळेस पंढरपूर आणि परिसर पाहून पर्यटन न करता तीर्थाटन करण्याचे ठरवले होते. विठ्ठलाचे दर्शन झाले आता स्वामी महराजांचे दर्शन घेऊन घरी परतणार आहोत, असे मुंबई येथील भारत वरपे यांनी सांगितले. विठ्ठलाच्या मुखदर्शनास अर्धा तास लागत आहे. तर पदस्पर्श दर्शनास २ ते ३ तास लागत आहेत. येथे आलेले भाविक प्रासादिक कुंकू, बुक्का,पेढे अगरबत्ती आदी खरेदी करतानाचे चित्र होते. त्यामुळे व्यापाऱ्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत. असे असले तरी भाविक आणि पर्यटकांचा ओढा आता पंढरीकडे वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांना अधिकाधिक चांगल्या सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्यात अशी माफक अपेक्षा भाविकांची आहे.

Story img Loader