Pandharpur Pad Sparsh Darshan Closed: पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन येत्या १५ मार्च पासून बंद राहणार आहे. मात्र भाविकांना रोज सकाळी ५ ते ११ या कालावधीत मुख दर्शन घेता येणार आहे. या शिवाय मंदिराच्या बाहेर स्क्रीनवर देवाचे दर्शन घेता येईल. आषाढी पूर्वी गाभाऱ्यातील सर्व कामे पूर्ण होतील, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. तसेच या काळात देवाच्या सर्व नित्योपचारांमध्ये कोणताही खंड पडणार नाही. मात्र पाद्य, तुळशी पूजा बंद राहणार असे औसेकर महाराज यांनी सांगितले.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे संवर्धनाचे काम सुरु झाले आहे. या कामी राज्य सरकारने निधी उपलब्ध केला आहे. पुरातत्व विभागाने मंदिरात नव्याने केलेले बांधकाम, ग्रेनाईट फरशी, टाईल्स, लाईट फिटिंग, दर्शन रांग,ऑईल पेंट आदी काढून मंदिराचे मूळ रूप, पुरातन स्वरूप प्राप्त करून देणार आहे. याचे भूमिपूजन कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. आणि मंदिरातील महालक्ष्मी मंदिर आणि बाजीराव पडसाळी येथील काम सुरु झाले आहे. आता श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या गर्भगृहात म्हणजेच गाभाऱ्याचे काम करायचे आहे. यामध्ये गाभाऱ्यातील ग्रेनाईट फरशी, ऑईल पेंट,सिंमेट आदी काढून त्या ठिकाणी दुरुस्ती करावयाची आहे. त्यासाठी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये आणि आषाढी पूर्वी कामे पूर्ण व्हावीत, याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, वारकरी, महराज मंडळी, जिल्हाधिकारी यांची बैठक येथील भक्त निवास येथे पार पडली.
हेही वाचा : मोठी बातमी! वसंत मोरेंचा मनसे आणि राज ठाकरेंना अखेरचा जय महाराष्ट्र, मध्यरात्री केली होती ‘ती’ पोस्ट
या बैठकीला ह.भ.प. अंमळनेरकर महराज, राणा महराज वासकर, विठ्ठल महराज चवरे, वीर महाराज रघुनाथ कबीर महाराज, शाम महराज उखळीकर, मंदिर समितीचे सदस्य, समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते. हि बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद आणि मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महराज औसेकर यांनी याबाबत माहिती दिली. दि १५ मार्च पासून देवाचे पदस्पर्श दर्शन बंद राहणार आहे. तर १७ मार्च पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल साधरपणे ४५ दिवसांत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत देवाचे मुख दर्शन रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत घेता येणार आहे. तसेच मंदिराचे बाहेर स्क्रीन लावून देवाचे दर्शन घेता येईल. या कालावधीत वारकरी संप्रदायाची महत्वाची वारी म्हणजे चैत्री वारी आहे. दि. १५ एप्रिल ते २१ एप्रिल या वारी कालावधीत मुख दर्शन दिवसभर सुरु राहणार अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. तर हे काम करत असताना देवाच्या मूर्तीचे संरक्षण केले जाणार आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या मूर्तीवर दगड, वाळू अन्य काही उडू नये यासाठी बुलेटप्रुफ काच बसविण्यात येणार आहे. देवाचे नित्योपचार हे रोज ठरलेल्या वेळी होणार आहेत. तसेच त्या ठिकाणी एक कॅमेरा बसविण्यात येणार आहे. आणि रोज झालेल्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी घेणार आहेत. भाविकांचे दर्शन, देवाचे नित्योपचार खंडीत होणार नाही, असे औसेकर महाराज यांनी सांगितले.
हेही वाचा :”संजय राऊत खोटे बोलताहेत”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, ”आधी भांडणे मिटवावीत…”
- १५ मार्च पासून देवाचे पदस्पर्श दर्शन बंद
- रोज पहाटे ५ ते सकाळी ११ वाजेपर्यंत मुख दर्शन
- चैत्री वारीत म्हणजेच १५ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत दिवसभर मुख दर्शन
- देवाचे नित्योपचार सुरु, महापूजा बंद
- मंदिराच्या बाहेर स्क्रीनवर देवाच्या दर्शनाची सोय