पंढरपूर: कार्तिकी यात्रेनिमित पंढरीत येणाऱ्या भाविकांना दर्शन देण्यासाठी सावळ्या विठुराया आता २४ तास उभा राहणार आहे. ४ ते २० नोव्हेंबर या कालावधीत देवाचे दर्शन २४ तास राहणार आहे. देवाचा विश्रांतीचा चांदीचा पलंग विधिवत पूजा करून काढण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाच्या मागे आणि रुक्मिणी मातेच्या पाठीला मऊ कापसाचा लोड लावण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. दरम्यान, कार्तिकी एकादशी १२ नोव्हेंबर रोजी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या परंपरे नुसार आषाढी आणि कार्तिकी वारीच्या दरम्यान भाविकांना दर्शन सुलभ व्हावे म्हणून देव २४ तास उभा असतो. या कालवधीत देवाच्या शेजघरातील विश्रांतीचा पलंग काढला जातो. हा पलंग काढण्या आधी विधिवत पूजा केली जाते. त्या नंतर देवाच्या शेजघरातील पलंग बाहेर काढण्यात आला. यावेळी या चांदीच्या पलंगावरील देवाच्या गाद्या गिरद्या देखील बाहेर काढून ठेवण्यात आल्या. देवाचे शेजघर मोकळे करून ठेवण्यात आले. देवाचे सर्व राजोपचार बंद करून देव फक्त भाविकांच्या दर्शनासाठी सज्ज झाला आहे. देवाचे दर्शन २४ तास खुले केल्याने आता रोज पायावर ५० हजार तर मुखदर्शनातून ५० ते ६० हजार भाविकांना दर्शन मिळू शकणार आहे .

हेही वाचा : घरफोडीत तब्बल ११० तोळे सोन्याचे दागिने, दीड लाखांची रोकडही लांबवली

विठुरायाचे नित्यक्रम

पहाटे साडेचार वाजता देवाचे स्नान आणि नित्यपूजा करण्यात येईल. या काळात फक्त एक तास दर्शन बंद असेल. यानंतर दुपारी महानैवेद्याला १५ मिनिटे आणि रात्री नऊ वाजता लिंबू पाणी देण्यासाठी १५ मिनिटे दर्शन थांबविण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. याशिवाय संपूर्ण दिवस रात्र विठुराया आपल्या लाडक्या भक्तांना दर्शन देत उभा असणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur vitthal darshan 24 hours kartiki ekadashi 2024 css