पंढरपूरला अजित पवारांना येऊ देणार नाही असं काही लोक म्हणाले. मला त्यांना विचारायचं आहे काय रे? पंढरपूरचा देव आहे त्यालाही जात लागली का? पंढरपूरच्या देवाची पूजा कित्येक साधू संतांनी केली आहे. संत चोखामेळा, नामदेव महाराज कितीतरी ओबीसींनी केली आहे. किती नावं सांगू? पंढरपूरचा राजा सगळ्यांचा आहे. त्याच्या पूजेला तुम्ही यायचं नाही का? कारण तुम्ही आरक्षण दिलं नाही. काय संबंध? पंढरपूरचा राजा म्हणजे कृष्णाचा अवतार. कृष्ण हा यादव होता आणि यादव म्हणजे ओबीसी. देवाला जातच लावायची ठरली तर लावा जात असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ यांनी जोरदार टीका केली आहे. जालना या ठिकाणी झालेल्या सभेत छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शरद पवारांनी आदेशाचं पालन केलं
आज अनेक लोक सांगतात की शरद पवारांनी ओबीसींना आरक्षण दिलं आणि मराठ्यांचं नुकसान दिलं. मात्र मी हे सांगेन की व्ही. पी. सिंग सरकारने मंडल आयोगाद्वारे २७ टक्के आरक्षणाला मंजुरी दिली. त्यानंतर आम्ही शरद पवारांकडे मागणी केली तुम्ही त्याची अंमलबजावणी करा. त्यावेळी दुसऱ्या कुणालाही आरक्षण देण्याची मुभा त्यांच्या हाती नव्हती. ओबीसींना आरक्षण द्या हा केंद्र सरकारचा आदेश होता जो त्यावेळी शरद पवार यांनी पाळला असं छगन भुजबळ म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या डोक्याबाहेरच्या अनेक गोष्टी आहेत
आज मराठा समाजात नवं दैवत निर्माण झालं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की धनगर, माळी, तेली मधे घुसले आहेत. एक लक्षात घ्या मी काय सांगतोय कारण तुम्हाला कळलं पाहिजे. त्यांना कळणार नाही त्यांच्या डोक्याबाहेरच्या गोष्टी आहेत असं छगन भुजबळ मनोज जरांगेंना उद्देशून म्हणाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३४० व्या कलमात सांगितलं होतं की यांना आरक्षण मिळालं पाहिजे. त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना कमिटी नेमण्यात आली. त्यानंतर १९६८ मध्ये रणनवरे नावाचे उपसचिव होते त्यावेळेपासून हे आरक्षण सुरु आहे. एवढंच नाही तर हे आरक्षण ज्यावेळी मंडल आयोगाने दिलं तेव्हाही काही लोक कोर्टात गेले होते. त्यावेळी नऊ न्यायाधीश होते, त्यात पी. बी. सावंतही होते. त्यांनीही सांगितलं की ओबीसींचा मुद्दा योग्य आहे. त्यानंतर ओबीसींमध्ये २०१ जातींचा समावेश केला. सर्वोच्च न्यायलायच्या आदेशानंतर मार्च १९९४ मध्ये सरकारी आदेश दिला गेला. कुणाचं खाताय कुणाचं खाताय विचारता तुझं खातो का? असा सवाल भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना केला आहे.
कुणबी जात प्रमाणपत्रं देणं बंद करा
मला विचारणा करण्यात आली की निजामशाहीत पुरावे सापडले कुणबी असल्याचे तर आरक्षण द्यायचं का? मी हो म्हटलं होतं. त्यावेळी तुमचे देव घटी बसले होते. दोन दिवसांत पाच हजारांचे पुरावे साडेअकरा पुरावे झाले, नंतर साडेतेरा हजार पुरावे झाले. एकाला प्रमाणपत्र दिलं की त्याच्या नातेवाईकांनाही ते लागू. आजही आमच्या गरीब बांधवांना आठ आठ महिने वर्षे दाखले मिळत नाही. यांना पटापट आरक्षण देतात. पेनाने मराठ्याच्या पुढे कुणबी लिहितात आम्हाला दिसत नाही का? हे बंद झालं पाहिजे असंही छगन भुजबळ म्हणाले. चुकीचे दाखले दिले जात आहेत असाही आरोप भुजबळांनी केला आहे.