पंढरपूर : येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी एखाद्या भाविकाने दर्शनासाठी पैसे दिले तर त्या भाविकावर गुन्हा दाखल होणार आहे. तसेच पैसे घेणाऱ्यावरही गुन्हा दाखल केला जाणार, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. तसेच दोन महिन्यांनंतर येणाऱ्या कार्तिकी यात्रेत विठ्ठल मंदिराच्या संवर्धन कामातील नवे रूप पाहावयास मिळेल असेही औसेकर महाराज यांनी सांगितले.
येथील भक्त निवास येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आला. याची माहिती समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज यांनी दिली. दोन महिन्यांनंतर येणाऱ्या कार्तिक यात्रेमध्ये विठ्ठल मंदिराच्या संवर्धन कामातील नवे रूप पाहायला मिळणार आहेत. गोकुळ अष्टमीनंतर पुन्हा कामाला सुरुवात होणार आहे असे औसेकर यांनी सांगितले. तसेच विठ्ठलाच्या सहज आणि सुलभ टोकन दर्शनाची व्यवस्था ही कार्तिकी यात्रेत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होईल. ही व्यवस्था प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले
हेही वाचा : Jayant Patil : जयंत पाटलांची फडणवीसांवर खोचक टीका; म्हणाले, “महाराष्ट्राकडे पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही”
श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अँड माधवी निगडे, ह.भ.प.श्री. प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प.श्री. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत शासनास प्रस्ताव सादर करणे,त्याचबरोबर, दर्शन व्यवस्था, पूजा बुकिंग व्यवस्था, मोबाईल लॉकर पावती इत्यादीसाठी संगणक प्रणाली विकसित करणे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सखोल माहितीची लघु चित्रफीत (डॉक्युमेंटरी) तयार करणे, इत्यादी निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
हेही वाचा : Girish Mahajan : “ठराविक लोकांना इथं सोडलं”, बदलापूरच्या आंदोलनावरून गिरीश महाजनांचा विरोधकांवर गंभीर आरोप
मंदिरातील विविध प्रश्न आणि समस्यांबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी समितीच्या बैठकीत घेराव घातला. यामध्ये नुकतेच फुल विक्रेते आणि दोन सुरक्षारक्षक यांच्यावर कारवाई झाली. यात पैसे घेणाऱ्यांवर कारवाई झाली. मात्र पैसे देणाऱ्यावरही गुन्हा दाखल करा, निलंबित केलेल्या सुरक्षारक्षकांना कामावर घ्या, अशा अनेक मागण्या स्थानिक पदाधिकारी नागेश भोसले, दीपक वाडदेकर, माउली हळणवर आदींनी केल्या.