पंढरीची वारी विठ्ठलाच्या निखळ भक्तीचे प्रतीक समजले जाते. मात्र, ही वारी शेकडो वर्षांपासून भक्तीबरोबरच एकता व सर्वधर्मसमभावाची शिकवणूकही देते आहे. वेगवेगळ्या समाजातील मंडळींचा वारी व पालखी सोहळ्यामध्ये समावेश असतो. त्यामुळेच वारीत चालणाऱ्याला कोणतेही नाव नसते. महिला असो अथवा पुरुष, गरीब असो अथवा श्रीमंत, प्रत्येकाचे नाव ‘माउली’ असेच असते. प्रत्येकजण एकमेकांना वारीत याच नावाने हाक मारीत असतो. पालखी सोहळ्यामध्ये शिंग फुंकणाऱ्यापासून परंपरेने असलेल्या विविध जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्यांमध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माची मंडळी आहेत. त्याचप्रमाणे वारीच्या वाटेवरील वेगवेगळ्या गावांमध्ये विविध समाज बांधवांकडून पिढय़ान्पिढय़ा वेगवेगळ्या परंपरा जोपासल्या जातात. त्यातूनच तुकोबांच्या पालखीला परीट समाज धोतराच्या पायघडय़ा घालतो, तर एका टप्प्यावर माउलींचा रथ वडार बांधव ओढून नेतात.
वारीच्या वाटेवर पालखी सोहळा असताना छोटय़ा-मोठय़ा वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी विशिष्ट समाजाचा, तर काही ठिकाणी संपूर्ण गावाकडून ही परंपरा मोठय़ा श्रद्धेने जपली जाते. लोणंद येथे माउलींची पालखी आल्यानंतर गावाकडून नैवेद्य देण्याची परंपरा आहे. पुरणपोळीचा हा नैवेद्य अगदी बँड लावून वाजत-गाजत आणला जातो. तोंडले-बोंडले येथे दुपारच्या विश्रांतीसाठी पालखी दाखल होते तेव्हा गावातील लोक वेगवेगळ्या धान्याच्या भाकरी व त्याबरोबर जवस, शेंगदाणा आदी विविध पदार्थाच्या चटण्या, ठेचा, पिठलं घेऊन येतात. ही अनोखी मेजवानी वैशिष्टय़पूर्ण असते. गावात प्रत्येक घरात अगदी पहाटेपासूनच या मेजवानीची तयारी सुरू असते. फलटण येथे माउलींच्या पालखीच्या शाही स्वागताची परंपरा आहे. अगदी गुलाबपाण्याची उधळण व पायघडय़ा टाकून पालखीचे स्वागत होते. सोलापूर जिल्ह्य़ातील प्रवेशाबरोबरच विविध ठिकाणी अगदी तोफांची सलामीही पालखीला दिली जाते.
गावात पालखी आली म्हणजे एक चैतन्याचे वातावरण असते. प्रत्येकजण आपापल्या परीने सोहळ्यासाठी काहीतरी करीत असतो. काही समाज बांधव सोहळ्याच्या परंपरेचा भाग असतात. वाखरी येथे राज्यातील सर्व संतांच्या पालख्या एकत्रित येतात व तेथून त्या पंढरीनाथाच्या नगरीत दाखल होतात. माउलींची पालखी पंढरीत दाखल होण्यापूर्वी काही अंतरावर एक परंपरा जोपासली जाते. माउलींची पालखी मूळ रथातून भाटे यांच्या रथात ठेवली जाते. माउलींचा हा रथ वडार समाजातील बांधव ओढत पंढरपुरात नेतात.
दुसरीकडे तुकोबांच्या पालखी सोहळ्यातही विविध समाज बांधवांच्या परंपरा जोपासल्या जातात. बारामती मुक्कामानंतर सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी काटेवाडी गावात येतो. मुख्य रस्त्यापासून पालखी खांद्यावरून गावात आणण्यात येते. त्यावेळी गावातील परीट समाजाकडून पालखीसाठी धोतराच्या पायघडय़ा घातल्या जातात. समाजातील तरुण मंडळी त्यात हिरीरिने सहभागी होतात. याच गावातून पालखी पुन्हा मुख्य रस्त्यावर आल्यानंतर आणखी एक परंपरा जोपासली जाते ती म्हणजे मेंढय़ांचे िरगण. धनगर समाजातील मंडळींकडून ही परंपरा जोपासली जाते. रथात पालखी ठेवल्यानंतर मेंढय़ांचा मोठा कळप रथाभोवती फिरविला जातो. हे िरगण झाल्याशिवाय पालखी मार्गस्थ होत नाही.
विविध समाजाच्या वेगवेगळ्या स्वागताच्या पद्धतीतून व कामातून या परंपरा निर्माण झाल्या असतील. त्या कुणी किंवा कधी सुरू केल्या, याला फारसे महत्त्व नाही. पण, या परंपरांच्या माध्यमातून वारीच्या वाटेवर वेगवेगळ्या समाजाचा सहभाग सोहळ्यात होतो. त्यातून संतांना अपेक्षित सामाजिक एकतेचा संदेश मिळतो, या गोष्टीला मात्र निश्चितच महत्त्व आहे.
– पावलस मुगुटमल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा