पंढरपूर : एकीकडे हरीनाम आणि विठ्ठल भक्तीने पंढरी सजली आहे. सर्व संतांच्या पालख्या पंढरीत विसावल्या आहेत. टाळ मृदंग, भजन, कीर्तन आणि भाविकांची गर्दी दिसून येत आहे. यंदा सुरवातीला उन्हाचा तडाका त्याच वेळी लांबलेला पाऊस यामुळे भाविकांची संख्या कमी दिसून आली. यंदा दशमीला सायंकाळपर्यंत जवळपास ८ ते ९ लाख भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी दुपारी विठ्ठलाची दर्शन रांग पत्रा शेड १० च्या पुढे गेली होती. शेवटच्या भाविकाला दर्शन घेण्यासाठी साधारणपणे १४ ते १५ तास लागत असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
पावलो पंढरी पार नाही सुखा … भेटला हा सखा मायबाप …. या अभंगाप्रमाणे भाविकांची विठ्ठल दर्शनाची तृष्णा पूर्ण झाली. यंदा पावसाने ओढ काढल्याने यात्रेवर परिणाम होईल असे वाटत होते. मात्र राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. त्यामुळे पेरणीची कामे सुरू झाली आहे. परिणामी प्रशासनाने जो अंदाज व्यक्त केला. त्यापेक्षा कमी भाविक दाखल झालेत. असे असले तरी येथील मठ, धर्मशाळ, लॉज, मोकळे पटांगण जिथे जागा मिळेल तिथे भाविकांच्या राहुट्या, तंबू, पहावयास मिळत आहे. तसेच शहरातील मंदिर परिसर, प्रमुख रस्त्यावर भाविकांची वरदळ आहे. सर्वत्र भजन, कीर्तन, हरिनामाच्या गजराने नगरी दुमदुमून निघाली आहे.
हेही वाचा – सांगली : लाचखोर पालिका अधिकाऱ्याच्या घरातून सात लाखांची रोकड जप्त
मंदिर समितीने दर्शन रांगेतील भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून शेड उभे केले आहेत. या शिवाय आरोग्य, पिण्याचे पाणी, नाष्टा दिला जात असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर जागेत भाविक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त तसेच गर्दीच्या ठिकाणी ‘माउली पथक’ पोलीस प्रशासनाने तैनात केले आहे. यंदा जादा एस.टी बसेस सोडण्यात आल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्या जास्त दिसून आली. आरोग्य विभागाच्या महाआरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहाटे ५ वाजता रांगेत उभा होतो सायंकाळी साडेपाच वाजता दर्शन झाले, असे पालघर येथील एका भाविकाने सांगितले.