शेतकऱ्यांना दावणीला चारा दिला जावा, ही विरोधी पक्षात असताना आपण मागणी केली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर हा प्रयोग अमलात आणण्यात अपयश आल्याची कबुली ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी खरीप हंगामाच्या तयारीची बठक मुंडे यांनी घेतली. त्यानंतर पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या. खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुधाकर भालेराव उपस्थित होते. राज्यात सलग ४ वर्षांपासून दुष्काळी स्थिती आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्याला बी-बियाणे, खत, पीककर्ज याची कमतरता पडू नये यासाठी आपण आढावा बठक घेतली. ज्या बँका ठरवून दिलेली रक्कम पीक विम्यापोटी वितरित करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. जनावरांचा चारा प्रसंगी परप्रांतातून आणून शेतकऱ्यांची गरज भागवली जाईल. या हंगामात दावणीला चारा देण्याचे नियोजन नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाडय़ात पाणीप्रश्न तीव्र बनला आहे. मराठवाडय़ातील संपूर्ण शेती इस्राएल पद्धतीने सिंचनाखाली आणली जाईल. तुषार, ठिबक सिंचनाचाच वापर करण्यासाठी प्रबोधन केले जाणार असल्याचे त्या म्हणाल्या. रेल्वेस्थानकावरून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जाणाऱ्या जलवाहिनीच्या कामाचा प्रारंभ पालकमंत्री मुंडे यांनी केला. साई बंधाऱ्याच्या लोकसहभागातून सुरू असलेल्या कामाचीही त्यांनी पाहणी केली.