दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा ३ जूनचा अर्धवट राहिलेला दौरा पूर्ण करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे, तसेच आगामी रणनीती ठरविण्यासाठी भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा गोपीनाथ मुंडे उद्यापासून (रविवार) जिल्हय़ात दौरा करणार आहेत. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, नारायणगड येथे भेट देऊन त्या शहरात भाजप कार्यकर्त्यांना भेटणार आहेत. सोमवारी ऊसतोड कामगार संघटनेची बठक होणार आहे.
दिवंगत मुंडे केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ३ जूनला परळीत सत्कार स्वीकारण्यास येणार होते. सुरुवातीला श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड, नारायणगड व बीड शहरात सत्कार स्वीकारून ते परळीला जाणार होते. मात्र, सकाळीच दिल्लीत त्यांचे किरकोळ अपघातात निधन झाले. तब्बल सव्वा महिन्यानंतर मुंडे यांच्या राजकीय वारस आमदार पंकजा मुंडे वडिलांचा दौरा पूर्ण करून सक्रिय होत आहेत. सकाळी गहिनीनाथ गड व नारायणगड येथे भेट दिल्यावर त्या शहरात येतील.
दुपारी यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात शिवसंग्रामतर्फे होणाऱ्या मराठा आरक्षण विजयी मेळाव्याला उपस्थिती, त्यानंतर भाजप जिल्हा कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची भेट, प्रसार माध्यमांशी चर्चा करणार आहेत. सोमवारी ऊसतोड मजूर, मुकादम, कामगार, वाहतूकदार संघटनेशी चर्चा करून साखर संघाशी आगामी कराराबाबत भूमिका त्या ठरवणार आहेत. ४० वष्रे ऊसतोड मजुरांच्या संघटनेचे नेतृत्व दिवंगत मुंडे यांनी केले. मजुरांच्या कामाचे दर ठरविण्यासाठी मुंडे व शरद पवार यांची समिती कार्यरत आहे. ऊसतोड मजुरांच्या संघटनेने पंकजा मुंडे यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे जाहीर केले आहे.