भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने कारवाई केली. अशातच पंकजा मुंडेंनी “आर्थिक अडचणीत असलेल्या इतर काही कारखान्यांना सरकारकडून मदत मिळाली पण माझ्या कारखान्याला सरकारकडून मदत मिळाली नाही,” अशी खंत व्यक्त केली. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. राज्यभरातील पंकजा मुंडे समर्थकांनी पैसे गोळा करत आर्थिक संकटात सापडलेल्या पंकजा मुंडेंसाठी निधी उभारण्यास सुरुवात केली. मात्र, आता स्वतः पंकजा मुंडेंनी ही आर्थिक मदत गोळा करू नका, असं आवाहन केलं आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या पोस्टमध्ये पंकजा मुंडे म्हणाल्या, “तुमच्या समर्थनाने भरून पावले. सर्वच जाती-धर्माच्या लोकांनी माझी एवढी काळजी घेतली. सर्वांचे धन्यवाद, पण एवढं ऐका.”

“माझ्यासाठी पैसे जमा करण्याची आवश्यकता नाही”

पोस्ट केलेल्या व्हिडीओत पंकजा मुंडे म्हणाल्या, “दुष्काळी भागात उद्योग करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आपल्याला ज्याला सामोरं जावं लागलं ते थोडं अधिकचं आहे. सर्व विषय आपल्या बाजूने असतानाही आपल्याला या अडचणींना सामोरं जावं लागलं आहे. त्यामुळे तुमच्या या भावना आहेत. तुमच्यात गोपीनाथ मुंडेंनी स्वाभिमानाचं बिजारोपण केलं आहे. या स्वाभिमानामुळे तुम्ही सर्वजण एकत्र आलात आणि आपण पैसे जमा करू पंकडा मुंडेंचा जीएसटी भरू असं ठरवलं. मात्र, असं करण्याची आवश्यकता नाही.”

“आपल्यासाठी परिस्थिती अयोग्य असली, तरी आपली पावलं योग्य दिशेनेच”

“त्यात नियमाने काय पाऊलं उचलायचे, काय कारवाई करायची, अपिल करायचं, बँकांच्या विषयात काय करायचं याबाबत योग्य ते सल्ले घेतले जात आहेत. वकील, सीए यांच्या सल्ल्यानुसार योग्य ती पावलं उचलली जात आहेत. परिस्थिती आपल्यासाठी अयोग्य असली, तरी आपली पावलं योग्य दिशेनेच जावीत असा माझा सतत प्रयत्न असतो,” असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

हेही वाचा : “राष्ट्रीय नेत्या असूनही तुम्हाला अद्याप अमित शाहांनी वेळ का दिला नाही?”, पंकजा मुंडे स्पष्ट म्हणाल्या…

“हात जोडून फक्त एकच विनंती आहे की, अशी कोणतीही रक्कम…”

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, “लोक जे पैसे जमा करत आहेत त्याचे आकडे बघून मला भोवळ आली. आपण किडूम मिडूक एकत्र करून संसार करणारे लोक आहोत. अशा परिस्थितीत माझ्यासाठी तुम्ही जे आकडे गोळा करत आहात, शून्य जोडत आहात ते बघून मला तुमच्या दिव्य शक्तीचा आभास झाला. हे माझं मोठं भाग्य आहे. हात जोडून फक्त एकच विनंती आहे की, अशी कोणतीही रक्कम तुम्ही जमा करू नये. या कारणासाठी मला अशी कुठलीही आर्थिक मदत करू नये. या विषयांना मी माझ्या पद्धतीने मार्गी लावण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मला यात यश येईल यासाठी फक्त आशीर्वाद द्या.”

“तुम्ही जमा केलेले पैसे घेणं मला शोभत नाही”

“मी विनंती करते की, कुणीही आपल्या घरात मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे, मुलांच्या शिक्षणासाठी जमवलेले किंवा व्यवसायासाठी जमवलेले पैसे मला देण्याचं काहीही कारण नाही. तुम्ही मला पैसे जमा केल्याचे फोटो पाठवत आहात. या आकड्यांवरून मी अंदाज घेतला, त्याप्रमाणे आतापर्यंत ६-७ कोटी रुपयांची रक्कम दोन दिवसात जमा झाली आहे. तुम्ही २० नाही, ४० कोटी रुपये जमा कराल याचा मला विश्वास आहे. मात्र, ते पैसे घेणं मला शोभत नाही,” अशी भावना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली.

हेही वाचा : “हा तुमचा पक्षाला इशारा आहे का?”, पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या, “मी त्यांना…”

“कितीही अडचण झाली, तरी आई लेकराच्या ताटातील खात नसते”

“मी तुम्हाला देण्याच्या भूमिकेत आहे. कितीही अडचण झाली, तरी आई लेकराच्या ताटातील खात नसते. कुणी कितीही टीका केली, तरी मी तुमच्या आईच्या भूमिकेत आहे. तुमच्या तोंडचा घास मी कधीच खाणार नाही. मी यातून मार्ग काढेन. आपण यातून बाहेर पडू हा मला विश्वास आहे,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde appeal supporter over crowd funding amid action on beed sugar factory pbs
Show comments