पारनेर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बाबासाहेब तांबे यांना विजयी करा, पारनेर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करून त्यावर शेतक-यांची मालकी प्रस्थापित करण्याची जबाबदारी आपली राहील, अशी ग्वाही पंकजा मुंडे-पालवे यांनी दिली. या निवडणुकीत महाराष्ट्राला काँग्रेस व राष्ट्रवादीमुक्त करण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे उमेदवार बाबासाहेब तांबे यांच्या प्रचारार्थ बुधवारी येथील बाजारतळावर पंकजा यांची सभा झाली. या सभेसाठी जमलेला जनसमुदाय पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्याची चर्चा दिवसभर सुरू होती.  
पंकजा यांनी राज्यातील आघाडी सरकारवर सडकून टीका करीत राज्यात भाजपचेच सरकार सत्तेवर येणार असल्याचा दावा केला. सभेस उमेदवार बाबासाहेब तांबे यांच्यासह खासदार दिलीप गांधी, तालुकाध्यक्ष पोपटराव पवार, साहेबराव मोरे, राळेगणसिद्घीचे सरपंच जयसिंग मापारी, बाबाजी तरटे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
पंकजा म्हणाल्या, गोपीनाथ मुंडे यांनी पारनेर कारखाना भाडेतत्त्वावर चालवून शेतकरी व कामगारांच्या हिताचे रक्षण केले. त्यांच्यानंतर मात्र हा कारखाना आता बंद आहे. तालुक्यातील जनतेने तांबे यांना विजयी केले तर हा कारखाना कर्जमुक्त करून तो शेतक-यांच्या मालकीचा करण्याची जबाबदारी माझी असेल. पस्तीस वर्षे संघर्ष करून गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य माणसाला सावली उपलब्ध करून दिली. त्याच जोरावर लोकसभा निवडणुकीत यश मिळाले. मात्र ही सत्ता उपभोगण्यासाठी मुंडे आपल्यात राहिले नाहीत. त्यामुळे माझे भांडण काँग्रेस व राष्ट्रवादीमधील थातूरमातूर नेत्यांशी नसून नियतीशी आहे. मुंडे यांना अभिप्रेत असलेली भाजपची सत्ता राज्यात येईपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. राज्यात भाजपचा मुख्यमंत्री होणार ही काळय़ा दगडावरची पांढरी रेघ असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रात भाजपचे सरकार असून राज्यातही भाजपचेच सरकार येणार असल्याने पारनेर मतदारसंघातही भाजपचाच आमदार हवा आहे. खासदार दिलीप गांधी यांच्या मतदारसंघातील सर्व तालुक्यांत निधी देण्याचा निर्णय घेतल्यावर तो मिळविण्यासाठी तेथे भाजपचाच आमदार असला पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा