भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी बुधवारी (१३ मार्च) जाहिर झाली. भाजपाने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकिट कापले. आता त्यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर आज (१४ मार्च) खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर भाष्य केले. तसेच पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे प्रीतम मुंडे यांचा पुढचा प्लॅन काय? असा प्रश्न विचारला जात आहे. या पार्श्वभूमीवरच खासदार प्रीतम मुंडे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या उमेदवारीबाबत देखील त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.
पंकजा मुंडेंच्या उमेदवारीवर प्रीतम मुंडे म्हणाल्या…
पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहिर झाली तेव्हा काय वाटलं? असा प्रश्न प्रीतम मुंडे यांना विचारण्यात आला, यावर त्या म्हणाल्या, “पंकजा मुंडे लोकसभेला जात असल्या तरी मी त्यांना काही सांगण्याची आवश्यता नाही. माझा जरी लोकसभेतला १० वर्षाचा अनुभव असला तरी पंकजाताई या माझ्या नेत्या आहेत. नेत्यांना शिकवण्याचे दिवस अजून आलेले नाहीत. पण पंकजा मुंडे यांच्यासाठी हा वेगळा अनुभव असणार आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण तयारीला लागलो आहोत. गेल्या पाच वर्षांपासून बीड जिल्हा ज्याची वाट पाहत होता, तो क्षण आलेला आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी आहोत”, असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा : ‘तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी?’ निलेश लंके म्हणाले, “साहेब सांगतिल तो आदेश..”
पंकजा मुंडे यांना काय सल्ला देणार?
खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी पंकजा मुंडे यांना काय सल्ला द्याल? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, “पंकजा ताईंचे बोट धरून गेल्या १० वर्षांत मी प्रत्येक पाऊल टाकले आहे. त्यामुळे मी त्यांना काही सूचना देण्याची आवश्यकता नाही. पण मी त्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी घेतलेले आहे. त्या सक्षम, खंबीर आणि प्रगल्भ आणि अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे त्यांना मार्गदर्शनाची गरज नाही”, असे प्रीतम मुंडे यांनी यावेळी सांगितले.
खासदार प्रीतम मुंडे यांची पुढची योजना काय?
प्रीतम मुंडे यांच्याऐवजी पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेची उमेदवारी भाजपाने जाहिर केली. त्यामुळे आता खासदार प्रीतम मुंडे यांचा पुढचा प्लॅन काय? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. या संदर्भात बोलताना खासदार प्रीतम मुंडे म्हणाल्या, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात की, तुम्ही एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रीत करता, तेव्हा त्याच गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे. त्यामुळे आम्हाला आता फक्त बीड लोकसभेची निवडणूक दिसत आहे. आधी पहिले लक्ष्य बीड लोकसभा आहे, त्यानंतर बाकीच्या गोष्टी”, असे खासदार प्रीतम मुंडे यांनी सांगितले.