माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (८ जानेवारी) पुण्यात एकाच गाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी आले. त्यामुळे एकत्र प्रवास करताना त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा केली, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच ही नव्या राजकारणाची नांदी तर नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. हाच प्रश्न भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या रविवारी नाशिकमध्ये माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाले, “मला वाटतं त्यात काही राजकारणाची नांदी नसेल. एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षाच्या नेत्याशी बोलणं, त्याच्या कुठल्या समारंभाला जाणं, त्याच्याबरोबर गाडीत बसणं या गोष्टींचा काही अर्थ लावण्याची गरज नाही. हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे लोक आज मंचावर होतो.”
“…तर तो त्यांचा नम्रपणा”
“शरद पवार वरिष्ठ आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पवारांच्या गाडीत बसले असतील तर तो त्यांचा नम्रपणा आहे, असं मला वाटतं,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.
“इतिहास घडताना तिथं उपस्थित होतो असं बोलू नये”
महापुरुषांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “महापुरुषांवर बोलावं का असं मला विचारलं तर जरूर बोलावं असं मी सांगेन. मात्र, महापुरुषांच्या त्या कंगोऱ्यांवर बोलावं ज्यातून लोकांना आदर्श घेता येईल. त्यावर जास्त बोलावं. इतिहास घडताना आपण तिथं उपस्थित होतो असं बोलू नये, असं मला वाटतं.”
“संभाजीराजे कोण होते हे सांगण्याच्या मी पात्रतेची नाही”
“संभाजीराजे स्वराज्यरक्षक होते की धर्मवीर हे सांगण्याच्या मी पात्रतेची नाही. मी खूप लहान आहे. मी एवढंच सांगेन की संभाजी महाराज या राज्याचा स्वाभिमान आहेत. प्रत्येक तरुणाचा स्वाभिमान आहेत,” असंही पंकजा मुंडेंनी नमूद केलं.
हेही वाचा : शरद पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा एकाच गाडीतून प्रवास, राजकीय चर्चांना उधाण
फेब्रुवारीपर्यंत सरकार पडणार या राऊतांच्या दाव्यावर पंकजा मुंडेंचं प्रतिक्रिया
पंकजा मुंडेंनी यावेळी फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार पडणार या संजय राऊतांच्या दाव्यावरही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “मी संजय राऊत यांच्या सरकार पडण्याच्या दाव्यावर मार्चमध्ये उत्तर देईन.”